विकासाच्या ‘इकोसिस्टीम'मुळे राज्यात मोठी गुंतवणूक - मुख्यमंत्री फडणवीस

‘बुलेट ट्रेन'ने २०२८ पर्यंत प्रवास शक्य

मुंबई : राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे सुरु आहेत. त्यामध्ये रस्ते, रेल्वे, बुलेट ट्रेन, जलमार्ग आदिंसह बंदर आणि विमानतळ विकासाच्या कामांचा समावेश आहे. या संपूर्ण विकासाच्या ‘इकोसिस्टीम'मुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत देशाचे नेतृत्व करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

‘इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडर समिट-२०२५'चे मुंबईत आयोजन करण्यात आले आहे. या परिषदमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत सीएनबीसी टीव्ही-१८ वृत्तवाहिनीच्या संपादक शिरीन भान यांनी घेतली.

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम गतीने सुरु आहे. या ट्रेनने २०२८ पर्यंत प्रवास करणे शक्य होणार आहे. वाढवण बंदराजवळ ‘बुलेट ट्रेन'चे स्थानक निर्माण करण्यात येणार आहे. मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर पायाभूत सोयी-सुविधांच्या विकासाची कामे सुरु आहेत. सागरी किनारा रस्ता, अटल सेतू, विविध मेट्रो मार्गांची कामे त्यातली ठळक उदाहरणे आहेत. या सर्व विकास कामांमुळे मुंबईत गुंतवणूक ५० बिलियन डॉलरपर्यंत जाणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प गेम चेंजर ठरणारे आहेत. यासोबतच पुणे येथील नवीन विमानतळ, शिर्डी, नागपूर विमानतळाच विकास, नदी जोड प्रकल्प, बुलेट ट्रेन प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत, असेही ते म्हणाले.

सागरीकिनारा रस्ता विरारपर्यंत वाढविण्यात येत आहे. वाढवण बंदर सध्या अस्तित्वात असलेल्या जवाहरलाल नेहरु पोर्टपेक्षा तीन पट मोठे आहे. या बंदराला प्रवेश नियंत्रित असलेल्या महामार्गाने नाशिकपर्यंत जोडण्यात येऊन पुढे समृध्दी महामार्गाला जोडण्यात येईल. वाढवण बंदराजवळ नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्माण करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. तसेच या परिसरात चौथ्या मुंबईचेही निर्माण करण्यात येणार आहे. समृध्दी महामार्ग नंतर राज्यात नागपूर ते गोवा शवतीपीठ महामार्ग निर्माण करण्यात येणार आहे. महाराष्ट्र नेहमी भविष्यासाठी ‘रेडी' असणारे राज्य आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. राज्यात गुंतवणूकदारांना सोयी-सुविधा मिळण्यासाठी आणि गतीने गुंतवणूक येण्यासाठी ‘इज ऑफ डुईंग बिजनेस'मध्ये राज्य मोठी झेप घेत आहे. २०२९ मध्ये महाराष्ट्र ‘इज ऑफ डुईंग बिजनेस'मध्ये पहिला असेल.

गुंतवणुकदारांच्या सुविधेसाठी मैत्री पोर्टल विकसित करण्यात आले आहे. या माध्यमातून सिंगल विंडो सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली आहे. गुंतवणुकदारांना सिंगल विंडो सिस्टीममुळे उद्योग स्थापन करण्यास सुलभता येत आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

नवी मुंबई विमानतळ, अटल सेतूमुळे तिसरी मुंबई निर्माण...
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच अटल सेतू यामुळे तिसरी मुंबई निर्माण होणार आहे. या भागात नवीन एज्युसिटी निर्माण करण्यात येत आहे. जगभरातील विविध नामांकित विद्यापीठे या परिसरात शैक्षणिक दालन उघडणार आहेत. त्यासोबतच हेल्थ सिटी, इनोवेशनन सिटीचे निर्माणही करण्यात येत आहे.

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जा निर्मिती करण्यात येत आहे. कृषी क्षेत्राचे १६००० मेगावॅटची वीज पूर्णपणे सौर उर्जेवर निर्माण करण्यात येणार आहे. सध्या या क्षेत्रात २१ टक्के राज्याची क्षमता असून २०३० पर्यंत ती ५२ टक्क्यांपर्यंत नेण्यात येणार आहे.
-ना. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री-महाराष्ट्र.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

पावसाळ्यासाठी अधिक सतर्क राहण्याचे ना. गणेश नाईक यांचे प्रशासनाला निर्देश