पाणी साठवणूक टाकी धोकादायक
भाईंदरः मिरा-रोड येथील महाजन वाडी परिसरात असलेली पाणी साठविण्याची उंच टाकी धोकादायक अवस्थेत असल्याची तक्रार परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी महापालिकाकडे केली आहे.
मिरा-भाईंदर शहराला शहाड टेमघर पाणीपुरवठा योजना आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या मार्फत पाणी पुरवठा होत आहे. सदर पाणी साठविण्यासाठी महापालिकेने शहरात उंच टाक्या बांधलेल्या आहेत. परिसरातील लोकसंख्येच्या दृष्टीने त्यांची पाणी साठविण्याची क्षमता आहे. महाजन वाडी भागातील पाण्याच्या उंच टाकीत २० दशलक्ष लिटर्स पाणी साठ्याची क्षमता आहे. टाकी भरल्यावर पाणी वाहून जात असल्याने टाकीच्या खालील खचला असून कधीही दुर्घटना होण्याची शक्यता असल्याची तक्रार समाजसेवक नरेंद्र उपरकर यांनी महापालिकेकडे केली आहे. त्यानुसार महापालिका अधिकाऱ्यांनी या टाकीची पाहणी केली असून योग्य ती दुरुस्ती करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.
सदर टाकी जमिनीच्या आत १५ मीटर खोल खणून तयार केली आहे. टाकीला कोणताही धोका नाही. वाहून गेलेल्या पाण्यामुळे संरक्षक कुंपणाचा भाग खराब झाला आहे. संरक्षक भिंत नव्याने डिझाईन करून तयार केली जाईल.
- शरद नानेगांवकर, कार्यकारी अभियंता, मिरा भाईंदर महापालिका.