बाबासाहेब पुरंदरे नाट्यगृह लवकरच अद्ययावत

अंबरनाथ : शहरातील कलाप्रेमी आणि नाट्य रसिकांसाठी बाबासाहेब पुरंदरे खुले नाट्यगृह आणि उद्यान आता आधुनिक सोयी-सुविधांनी युक्त असे विकसित करण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हस्ते २ ऑगस्ट रोजी करण्यात आला.

अंबरनाथ मधील कला, नाट्य आणि सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी सुसज्ज सभागृहाची गरज होती. सदर बाब लक्षात घेऊन माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांनी तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या प्रकल्पासाठी निधीची मागणी केली होती. नगरविकास विभागाकडून यासाठी २.४८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही यासाठी सहकार्य केले.

या प्रकल्पासाठी निविदा ३१.५३ टक्के कमी दराने भरलेल्या ठेकेदाराने काम चांगल्या दर्जाचे आणि वेळेत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. या अद्ययावतीकरणानंतर नाट्यगृहाची वास्तू दुमजली होणार आहे. यामध्ये बंदिस्त स्टेज, खुले सभागृह, लहान मुलांसाठी खेळणी, ओपन जिम, जॉगिंग ट्रॅक, ऐतिहासिक शिवशिल्प असलेली भिंत, सीसीटीव्ही कॅमेरे अशा सुविधा उपलब्ध होणार आहेत. पहिल्या मजल्यावर नाटक, एकांकिका, नृत्य, आदिंचा सराव करण्यासाठी सभागृह तयार केले जाईल.

याप्रसंगी महिला संघटक सुवर्णा साळुंके, युवा सेना अधिकारी गणेश आयवले, वास्तुविशारद प्रभाकर आठवले, प्रसन्न चौधरी, प्रल्हाद भंगाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

७७ वर्षांनंतरही स्मशानभूमीकडे जायला रस्ता अनुपलब्ध