वाढवण विकासासाठी ‘सिंगापूर'ने सहकार्य करावे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उरण : भारत आणि सिंगापूर यांच्यातील सागरी व्यापार, पायाभूत सुविधा, डिजिटायझेशन, डेटा सेंटर्स आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील वाढते सहकार्य आणि अनेक सामंजस्य करारांमुळे आर्थिक बंध अधिक दृढ होत असून यामुळे विशेषतः महाराष्ट्र आणि सिंगापूरमधील संबंधांना नवीन आयाम मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उरण येथे व्यक्त केला. तसेच वाढवण बंदर विकासासाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या जवाहरलाल नेहरु पोर्ट ऑथॉरिटी आणि इंडियन पोर्टस्‌ असोसिएशन यांच्या वतीने जेएनपीए बिझनेस सेंटर, उरण येथे ग्रीन अँड डिजिटल मेरिटाईम कॉरिडॉर्स लिडर्स डायलॉग आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर सिंगापूरचे उपपंतप्रधान गान किम येंग, सिंगापूर परिवहन मंत्री जेफरी सियो, ‘जेएनपीए'चे चेअरमन उन्मेष वाघ, बंदरे-जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे सचिव टी. के. रामचंद्रन, आदि उपस्थित होते.

जेएनपीए येथील नवीन पीएसए टर्मिनलचे लवकरच उद्‌घाटन होणार असून सदर अत्याधुनिक सुविधा ‘जेएनपीए'च्या ५० टक्के कंटेनर क्षमतेचे नियोजन करेल. तसेच भारताच्या जागतिक व्यापाराला चालना देईल. या सुविधेमुळे भारताची सागरी शक्ती अधिक सक्षम होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. सदर प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सिंगापूरने केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी विशेष आभार मानले.

भारत आणि सिंगापूर यांच्यातील हरित आणि डिजिटल सागरी मार्गिकांच्या स्थापनेसाठीच्या सहकार्यावर भर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी शाश्वत सागरी परिसंस्थेची गरज अधोरेखित केली. दोन्ही देश नवीन तंत्रज्ञान, हरित इंधने आणि कार्यक्षमता यावर एकत्रित काम करीत असून भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांमधील प्रगतीमध्ये ईस्ट समुद्र उपक्रमामुळे सागरी सेवांच्या कार्यक्षमतेत वाढ होणार आहे, असे फडणवीस म्हणाले.

राज्यातील वाढवण बंदर प्रकल्प भारतातील सर्वात मोठे बंदरप्रकल्प असून सदर प्रकल्प वेळेत पूर्ण होईल. महाराष्ट्र तसेच भारताला सागरी महासत्ता म्हणून स्थापित करेल, असा विश्वास व्यक्त करीत या प्रकल्पामुळे भारताच्या सागरी पायाभूत सुविधांना नवीन दिशा मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

सिंगापूर नेहमीच भारताला सहकार्य करतो. या दोन्ही देशातीलभागीदारीचा विस्तार जेएनपीएपासून वाढवण बंदरापर्यंत होण्यायावेळी सिंगापूर परिवहन मंत्री जेफरी सिओ यांनी सिंगापूर आणि भारत यांच्यातील सहकार्याबद्दल मनोगत व्यक्त केले.

यावेळी ‘जेएनपीए'चे चेअरमन उन्मेष वाघ, जलमार्ग मंत्रालय सचिव टी. के. रामचंद्रन यांची समयोचित भाषणे झाली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महाराष्ट्रात १९,२०० कोटींच्या गुंतवणुकीचा मार्ग मोकळा -मुख्यमंत्री फडणवीस