डोंबिवली स्टेशन बाहेरील परिसर जलमय
डोंबिवली : सुरु असलेल्या मुसळधार पावसाने डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनबाहेरील परिसर जलमय झाले. एमआयडीसी निवासी भागातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. महपालिका प्रशासनाने सर्व शाळा आणि महाविद्यालयांना १९ ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर केली. मात्र, सकाळी मुंबईला कामावर चाललेल्या चाकरमान्यांचे हाल झाले. मुंबईतील मध्य आणि हार्बर मार्गामधील काही रेल्वे स्थानकातील रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती.
एमआयडीसी निवासी भागामधील मिलापनगर वंदे मातरम् उद्यान आणि सुदामानगर मधील चार बिल्डींग, गौरीनंदन सोसायटी परिसरात मोठ्या नाल्यातील पाणी रहिवाशी बंगलो आणि इमारतींच्या आवारात घुसले असून पाऊस असाच सुरु राहिल्यास पुराचे पाणी घरात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबद्दल सतर्क रहिवाशांनी केडीएमसी आणि एमआयडीसी प्रशासनाला कळविले आहे. रिजेन्सी अनंतम सिग्नल, वंदे मातरम् उद्यान जवळील मोठ्या नाल्याच्या संरक्षक भिंतीला काही ठिकाणी भगदाड पडले असून त्यातून नाल्याचे पाणी रस्त्यावर येत आहे. जर सदर भिंत कोसळून पडली तर मोठी आपत्ती येण्याच्या शवयतेने आजुबाजुचे रहिवाशी भयभीत झाले आहेत.
चार बिल्डींग गौरीनंदन सोसायटी परिसरातील मोठा नाल्यात गेल्या वर्षभरापासून पाईपलाईन शिािंपटग आणि नाला रुंदीकरणाचे काम अर्धवट स्थितीत असल्याने आता त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. एकंदरीत निवासी क्षेत्रातील मिलापनगर, खासदार बंगला, एम्स हॉस्पिटल रस्ता, सुदर्शन नगर आणि संदेश सोसायटी (महावितरण कार्यालय समोर) आदि परिसर जलमय झाला आहे. त्यात बारवी धरण भरल्याने त्यातील पाणी सोडल्याचे लोकांच्या कानी आल्याने लोक घाबरलेले दिसत आहेत. निळजे येथील काही भागात देखील पाणी साचले होते.