‘कल्याण बाजार समिती'ची निवडणूक प्रक्रिया रामभरोसे
कल्याण : ठाणे जिल्ह्यातील महत्वाच्या असलेल्या ‘कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती'च्या विद्यमान संचालक मंडळाचा ५ वर्षांचा कालावधी सन-२०२४ रोजीच संपुष्टात आला होता. मात्र, त्यांनतर आलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी राज्याच्या ‘पणन विभाग'ने संचालक मंडळाला ६ महिन्यांची दोनदा मुदतवाढ देऊन तब्बल १ वर्षाचा कालावधी विद्यमान संचालकांनी आपल्या पदरी पाडून घेतला.
या वाढीव मुदतीचा कालावधी २१ एप्रिल २०२५ रोजी संपुष्टात येणार असल्याने, जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक किशोर मांडे यांनी २७ फेब्रुवारी २०२५ रोजी अधिसूचना काढून ‘संचालक मंडळ'च्या निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द केली. तसेच हरकती-सूचनांवर निर्णय घेऊन त्यांनीच काढलेल्या अधिसुचनेनुसार २५ मार्च २०२५ रोजी अंतरिम मतदार यादी प्रसिध्द करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, आता एप्रिल महिना उजाडला तरी अंतरिम मतदार यादी प्रसिध्द होऊन, निवडणूक कार्यक्रम जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र, आता निवडणुकीबाबतच्या हालचाली मंदावल्याने शेतकरी, व्यापारी आणि माथाडी घटकांनी पणन विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेबाबत उलट-सुलट चर्चा सुरु केली आहे.
अनेक वादग्रस्त निर्णय, शेतकरी-व्यापारी आणि माथाडींच्या समस्या, वादग्रस्त नोकरभरती आदि प्रकारामुळे कायम चर्चेत राहिलेल्या ‘कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती'च्या निवडणुकीसंदर्भात देखील आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यापूर्वीच ६ महिन्यांची दोनदा मुदतवाढ मिळाल्याने विद्यमान ‘संचालक मंडळ'चा कालावधी २१ एप्रिल २०२५ रोजी संपुष्टात येणार आहे. याच धर्तीवर जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक किशोर मांडे यांनी २७ फेब्रुवारी २०२५ रोजी अधिसूचना काढून ‘संचालक मंडळ'च्या निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी जाहीर करुन निवडणूक प्रक्रियेला सुरुवात केली.
याच दरम्यान राजकीय अट्टाहासापोटी ‘बाजार समिती'च्या ‘संचालक मंडळ'च्या निवडणूकची प्रक्रिया सुरु झाली असताना, अगदी ३ महिन्यांच्या कालावधीसाठी सभापती आणि उपसभापती निवडणूक प्रक्रिया पार पाडून सभापतीपदी दत्ता गायकवाड आणि उपसभापती पदी गजानन पाटील विराजमान झाले. या सर्व प्रक्रिया पूर्ण होत असताना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक यांनी जाहीर केलेल्या अधिसुचनेनुसार २५ मार्च २०२५ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द होऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर होणे क्रमप्राप्त होते.
मात्र, आपल्याच अधिसुचनेचा विसर जिल्हा प्रशासनाला पडल्याचे दिसून येत आहे. अद्याप अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली नसल्याने आणि निवडणूक कार्यक्रम जाहीर न केल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण झाले आहे.
दरम्यान, वाढीव मुदतवाढीच्या कालावधीत विद्यमान ‘संचालक मंडळ'ला कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार नसल्याने ‘बाजार समिती'च्या कारभारावर परिणाम झाला आहे. पावसाळ्यापूर्वीचे कामे, बाजार आवरातील अनेक अडचणी, रस्ते आणि भाजीपाला विभागातील माल उतरवण्यासाठी बनविण्यात आलेल्या धक्क्यांची दुरावस्था अशा अनेक कारणांमुळे पुढील काळात शेतकरी, व्यापारी, माथाडी आदी घटकांना सेवा-सुविधांसाठी संघर्ष करावा लागणार आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पूर्ण करुन जिल्हा प्रशासनाने तात्काळ शेतकरी, व्यापारी आणि माथाडी घटकांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.
दुसरीकडे संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरु असताना विद्यमान सभापती दत्ता गायकवाड यांनी ७ एप्रिल रोजी विद्यमान ‘संचालक मंडळ'ची बैठक आयोजित केली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक किशोर मांडे यांना विचारले असता कृषी उत्पन्न बाजार समिती मतदार याद्यांमध्ये त्रुटी आढळल्याने फेर सादर करण्यास सांगितले असून २-३ दिवसांत अंतिम मतदार याद्या तयार होतील. त्यानंतर साधारण १५ दिवसांत कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल, असे त्यांनी सांगितले.