धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृहात ‘नाट्यमहोत्सव'ला हाऊसफुल्ल प्रतिसाद

अंबरनाथ : अंबरनाथ शहरात उभारण्यात आलेल्या धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिरात सध्या नाट्यमहोत्सव सुरु आहे. नव्याने लोकार्पण झालेल्या या नाट्यगृहातील मोफत आयोजित केलेल्या दर्जेदार नाटकांना अंबरनाथसह पंचक्रोशीतील रसिक प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला असून, सर्व प्रयोग ‘हाऊसफुल्ल' होत आहेत.

सुमारे ६५८ आसनक्षमता असलेले अद्ययावत नाट्यगृह अंबरनाथच्या सांस्कृतिक विश्वात एक नवी पर्वणी ठरले आहे. या ‘नाट्यमहोत्सव'मध्ये  ‘सही रे सही', ‘करुन गेलो गाव', ‘आज्जीबाई जोरात', ‘सखाराम बाईंडर', ‘संगीत देवबाभळी', ‘मी वर्सेस मी' यासारख्या सध्या गाजत असलेल्या नाटकांचे प्रयोग मोफत आयोजित करण्यात आले. अंबरनाथकरांचे शहरासाठी स्वतंत्र नाट्यगृहाचे स्वप्न १९ ऑवटोबर रोजी पूर्ण झाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या नाट्यगृहाचे लोकार्पण झाले आणि त्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने येथे ८ दिवसीय नाट्यमहोत्सव सुरु झाला.

या ‘नाट्यमहोत्सव'मुळे अंबरनाथ शहरासह नेरळ, कर्जत, बदलापूर आणि कल्याण तालुक्यातील रसिक प्रेक्षकही धर्मवीर आनंद दिघे  नाट्यगृहात गर्दी करीत आहेत. ‘महोत्सव'च्या निमित्ताने रसिक प्रेक्षकांना उत्कृष्ट कलाकृतींचा आस्वाद घेता येत आहे. या सर्व नाटकांना प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. तसेच ‘पुरुष' नाटक आणि ‘शिवबा' असे महानाट्य पार पडणार आहे, त्यासाठीही रसिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

दरम्यान, सांस्कृतिक विकासाला चालना देणाऱ्या या नाट्यगृहाच्या उभारणीबद्दल रसिक प्रेक्षक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार मानत आहेत. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मराडे पाडा शक्तिपीठ येथे कलावंतांची मांदियाळी