वर्षभरापूर्वी वीज मीटर पुनर्जोडणीसाठी पैसे भरुनही अद्याप वीजपुरवठा खंडीत
बदलापूर : खंडीत वीज मीटर पुनर्जोडणी शुल्क भरणा केल्यानंतर ‘महावितरण'कडून त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पुनर्जोडणी केली जाते. परंतु, बदलापूर येथे वीज ग्राहकाने पुनर्जोडणी शुल्क भरुन जवळपास वर्ष उलटत आले तरी अद्याप वीज मीटर पुनर्जोडणी न झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
बदलापूर पश्चिमेकडील हेंद्रेपाडा भागात राहणाऱ्या माधुरी शिंदे यांचे बदलापूर पूर्व भागात असलेले घर बंद अवस्थेत असते. मागील वर्षी काही महिन्यांचे थकीत बिल म्हणून १५ मार्च २०२४ रोजी थकीत बिल पाठवून आणि त्यांना सूचित करुन ‘महावितरण'ने त्यांचा वीज मीटर बंद केला. त्यानंतर १७ मार्च रोजी माधुरी शिंदे यांनी थकीत बिल दंडासहित भरले. तसेच लगेचच १० एप्रिल रोजी त्यांनी ‘महावितरण'च्या कार्यालयात ३१० रुपये वीज मीटर पुनर्जोडणी शुल्क भरणाही केला. मात्र, अद्यापपर्यंत शिंदे यांच्या घरच्या वीज मीटरची पुनर्जोडणी करण्यात आलेली नाही. यावर माधुरी शिंदे यांनी बदलापूर पूर्वेकडील खरवई येथील महावितरण कार्यालयात याबाबत विचारणा केली असता, तुमचे जुने मीटर कायमचे बंद करण्यात आले असून तुम्हाला आता नवे मीटर बसवून घ्यावे लागेल असे, ‘महावितरण'कडून सांगण्यात आले.
यावर जर माझे मीटर कायमचे बंद करण्यात आले होते, तर मग त्या मीटरच्या पुनर्जोडणीसाठी शुल्क का घेण्यात आले? तसेच त्याचवेळी माझे मीटर कायमचे बंद झाल्याबाबत अथवा नवीन मीटर बसवून घेण्यासंदर्भात मला सूचित का करण्यात आले नाही, असा मुद्दा उपस्थित करुन माधुरी शिंदे यांनी ‘महावितरण'च्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
दरम्यान, यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी ‘महावितरण'चे उपकार्यकारी अभियंता सुरेश सुराडकर यांच्याशी संपर्क साधला असता याप्रकरणी त्यांच्याकडे संबंधित कागदपत्रांची मागणी करण्यात आली आहे. त्यांच्याकडून कागदपत्रे मिळाल्यानंतर त्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.