‘ग्रीन मॅरेथॉन'द्वारे पर्यावरण संवर्धन संदेश प्रसारीत
नवी मुंबई : ‘जागतिक पर्यावरण दिन'चे औचित्य साधून ‘डी. वाय. पाटील क्लायमेट ॲक्शन लॅब'च्या वतीने आयोजित ‘ग्रीन मॅरेथॉन : रन फॉर द प्लॅनेट' या पर्यावरणपूरक उपक्रमात नवी मुंबई महापालिकेने आयोजन सहभाग करा घेत सदर उपक्रम यशस्वी केला. महापालिकेच्या वतीने आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षीच्या ‘जागतिक स्तरावर प्लास्टिक कच-याचे निर्मुलन' या ‘पर्यावरण दिन'च्या संकल्पेनेला अनुसरुन पर्यावरण सप्ताह साजरा केला जात आहे. या अंतर्गत नानाविध उपक्रमांचे आयोजन केले जात असून त्यामध्ये लोकसहभागावर भर दिला जात आहे. त्याचप्रमाणे विविध संस्थांमार्फत आयोजित पर्यावरणशील उपक्रमांतही महानगरपालिका सहभागी होत आहे.
३ जून रोजी ‘डॉ. डी. वाय. पाटील समुह'चे अध्यक्ष डॉ. विजय पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार ‘डी. वाय. पाटील क्लायमेट ॲक्शन लॅब'मार्फत डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअमपासून सुरु झालेल्या आणि नेरुळ पूर्व परिसरात निश्चित केलेल्या मार्गाने पुन्हा स्टेडिअमजवळ सांगता झालेल्या ५ कि.मी. अंतराच्या ‘ग्रीन मॅरेथॉन'मध्ये युवक, युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महापालिकाच्या वतीने उद्यान विभागाचे उपायुक्त किसनराव पलांडे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. अजय गडदे, क्रीडा-सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपायुक्त अभिलाषा म्हात्रे, ‘विजय पाटील स्कुल ऑफ मॅनेजमेंट'च्या कॉर्पोरेट रिलेशन मॅनेजर डॉ. विद्या श्रीनिवास यांनी झेंडा दाखवून ‘ग्रीन मॅरेथॉन'चा शुभारंभ केला. नेरुळ विभागाचे सहा. आयुक्त जयंत जावडेकर यांनी ‘ग्रीन मॅरेथॉन'मध्ये प्रत्यक्ष सहभाग करा घेतला होता.
‘पर्यावरण विघातक प्लास्टिकला नकार आणि कापडी पिशव्यांचा करु स्विकार', ‘से नो टू प्लास्टिक', ‘प्लास्टिकचा वापर टाळूया-पर्यावरण जपूया' अशा घोषवाक्यांचे फलक उंचावत ‘ग्रीन मॅरेथॉन'मध्ये २०० हून अधिक नागरिक सहभागी झाले होते. यामध्ये युवक-युवतींची संख्या लक्षणीय होती. ‘ग्रीन मॅरेथॉन'मधील विजेत्यांना सन्मानचिन्हे आणि मेडल्स देऊन गौरविण्यात आले. या माध्यमातून शाश्वत पर्यावरण विकासासाठी एक यशस्वी धाव करा घेण्यात आली.