कल्याण स्थानक सॅटीस प्रकल्पाला गती देण्याच्या हालचाली

कल्याण : कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत उपाययोजना करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त यांच्या दालनात सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत प्रथम कल्याण रेल्वे स्थानक परिसरात सुरु असणारा सॅटीस प्रकल्प कार्यान्वित होण्याच्या कामी भेडसावणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करण्यात आली.

सुभाष चौक परिसरातील रस्ता रुंदीकरणात बाधित असलेल्या ऑप्टिकल इमारतीचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे, या ठिकाणचे आवश्यक क्षेत्र महापालिकेला प्राप्त झालेले नाही. परिणामी, सुभाष चौकाकडील उड्डाणपुलाच्या उतारावरील कामास विलंब होत आहे. त्यामुळे कल्याण रेल्वेस्थानक कडील सुभाष चौककडे जाणाऱ्या वाहनांसाठी मुख्य रस्त्याकडील परळीकर मार्गापासून रामबाग रस्त्यावरुन सुभाष चौकपर्यंत एक दिशा मार्ग केल्यास उड्डाणपुलाच्या उताराच्या रिटेनिंग वॉलचे काम सुरु होऊ शकते. अशाप्रकारे वाहतूक नियंत्रण करण्याबाबत प्रस्ताव बैठकीमध्ये वाहतूक विभागासमोर मांडला असता त्यावर चर्चा होऊन ५ नोव्हेंबरपर्यंत वाहतूक विभागामार्फत अधिसूचना निर्गमित करुन १० नोव्हेंबरपर्यंत उड्डाणपुलाच्या रिटेनिंग कामास सुरुवात  करावी, अशा सूचना आयुक्त अभिनव गोयल यांनी दिल्या.

सॅटीस प्रकल्प अंतर्गत ‘एमएसआरटीसी'च्या इमारतीचे काम सुरु आहे. ‘एमएसआरटीसी'च्या बसेसची वाहतूक अद्यापही कल्याण बस स्थानकातून होत असल्याने बस स्थानकाचे काम पूर्ण करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे येथील बस वाहतूक दुर्गाडी येथून करण्याबाबत वारंवार सूचना देऊन देखील अद्यापपर्यंत कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे ५ नोव्हेंबरपासून लांब पल्ल्याच्या तसेच मुरबाड, पनवेल, भिवंडी येथे जाणाऱ्या सर्व बसेस दुर्गाडी येथून मार्गस्थ होतील, असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. यासाठी दुर्गाडी येथे विशेष प्रकल्प विभागामार्फत व्यवस्था करुन देण्यात आलेली आहे.

वालधुनी ब्रिजची दुरुस्ती लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबतही आयुक्त अभिनव गोयल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या बैठकीत सूचना दिल्या. कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्थानकाबाहेर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता, तेथे मोठ्या संख्येने असणाऱ्या रिक्षांचे नियोजन करण्याच्या सूचना आरटीओ आणि वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्थानक बाहेरील १५० मीटरचा परिसर फेरीवालामुक्त ठेवण्यासाठी वाहतूक पोलीस, आरटीओ, महापालिका प्रभागांचे सहाय्यक आयुक्त यांनी दररोज संयुक्तिक कारवाई करावी, अशाही सूचना आयुक्त गोयल यांनी बैठकीत दिल्या.

वाहतुकीला अडथळा ठरणारे वीजेचे खांब ‘महावितरण'ने त्वरित काढण्याची कारवाई करण्याची सूचना परिमंडळ-३ चे  पोलीस उपायुक्त अतुल झेंडे आणि आयुक्त गोयल यांनी यावेळी केली. एकंदरीतच नागरिकांचा रस्त्यावरील प्रवास विनासायास व्हावा यासाठी वाहतूक कोंडी दूर होण्याच्या अनुषंगाने सर्व प्राधिकरणांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त अभिनव गोयल यांनी बैठकीत केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उपवन तलावात लवकरच भगवान विठ्ठलाचा ५१ फुट उंच पुतळा