अनंत चतुर्दशी दिनी होणाऱ्या श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी नवी मुंबई महापालिकेचे सुव्यवस्थित नियोजन

नवी मुंबई : यावर्षी श्रीगणेशोत्सवास 27 ऑगस्टपासून उत्साहात प्रारंभ झाला असून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी महिन्याभरापूर्वींच गणेशोत्सवासंबधी पोलीसांसह सर्व प्राधिकरणे व गणेशोत्सव मंडळांच्या घेतलेल्या नियोजन बैठकीप्रसंगी केलेल्या आवाहनाला अनुसरून  ‘पर्यावरणपूरक प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव’ साजरा करण्यास नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिलेला आहे. अनेक नागरिकांनी व मंडळांनी पीओपी ऐवजी शाडूच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करून तसेच सजावटीतही प्लास्टिक, थर्मोकोलचा वापर टाळून पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्यास सकारात्मक प्रतिसाद देत इकोफ्रेंडली उत्सव साजरा करण्यावर भर दिला. त्यांना विसर्जनस्थळी आकर्षक कागदी पिशवी आणि आयुक्तांच्या स्वाक्षरीचे प्रशस्तिपत्र देऊन ‘स्वच्छता व पर्यावरणमित्र’ म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला.

त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 6 फूटांपर्यंतच्या उंच मूर्ती जलस्त्रोत रक्षणाच्या दृष्टीने कृत्रिम तलावातच विसर्जन करण्याच्या आवाहनासही नागरिकांकडून चांगला प्रतिसाद लाभला.  नैसर्गिक जलस्त्रोतांचे रक्षण व्हावे यादृष्टीने नवी मुंबई महापालिकेच्या वतीने सर्व विभाग कार्यालय क्षेत्रात ठिकठिकाणी 143  इतक्या मोठया संख्येने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली. पर्यावरणप्रेमी नागरिकांनी कृत्रिम तलावांमध्ये श्रीमूर्ती विसर्जनास मोठया प्रमाणावर पसंती दर्शविली. विसर्जनासाठी महापालिकेने केलेल्या कृत्रिम तलावांच्या व्यवस्थेसह विसर्जन स्थळावरील सुविधांबाबत स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.

नवी मुंबई महापालिकेने 22 नैसर्गिक व 143 कृत्रिम अशा 165 विसर्जन स्थळांवर केलेल्या सुयोग्य व्यवस्थेमुळे श्रीगणेशोत्सवातील दीड दिवस, पाच दिवस, गौरीसह  सात दिवस अशा तिन्ही विसर्जन दिवशी श्रीमूर्ती विसर्जन अत्यंत सुव्यवस्थित रितीने संपन्न झाले. या तीन विसर्जन दिवशी 32,757 श्रीमूर्तीना व 1959 गौरींना भावपूर्ण निरोप देण्यात आला.
6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीदिनीही 6 फूटांपर्यंतच्या श्रीमूर्तींचे मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आपल्या घराच्या व मंडळाच्या मंडपासासून जवळ असलेल्या कृत्रिम विसर्जन तलावातच विसर्जन करावे असे आवाहन करण्यात येत आहे. याठिकाणी सर्व प्रकारची व्यवस्था स्वयंसेवकांसह सज्ज असणार आहे.

तसेच या दिवशी सार्वजनिक श्रीगणेशोत्सवांच्या आकाराने मोठ्या मूर्तींचेही विसर्जन होणार असल्याने महापालिका क्षेत्रातील सर्व विसर्जन स्थळांवर अधिक सक्षम व्यवस्था करण्यात आलेली आहे. अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व डॉ. अजय गडदे यांच्यासह परिमंडळ-1 उपआयुक्त सोमनाथ पोटरे व परिमंडळ-२ उपआयुक्त संजय शिंदे यांच्या नियंत्रणाखाली आठही विभाग कार्यालयांमार्फत संबधित विभागाचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी तसेच शहर अभियंता शिरीष आरदवाड व अति.शहर अभियंता अरविंद शिंदे आणि सर्व कार्यकारी अभियंता व त्यांचे सहकारी तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांच्या माध्यमातून श्रीमूर्ती विसर्जनासाठी संबधित अधिकारी, कर्मचारी, स्वच्छताकर्मी व स्वयंसेवक विसर्जन स्थळांवर तत्परतेने कार्यरत असणार आहेत.

यामध्ये सर्व 22 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर संबंधित विभाग कार्यालयांच्या माध्यमातून मोठया प्रमाणात स्वयंसेवक व लाईफगार्ड्स कार्यरत असणार आहेत. त्यासोबतच अग्निशमन दलाचे जवानही कार्यतत्पर राहणार आहेत. पोलीस यंत्रणेचेही सर्व विसर्जन स्थळांवरील कायदा व सुव्यवस्थेकडे बारकाईने लक्ष असणार आहे. सर्व नैसर्गिक विसर्जन स्थळांवर नागरिकांच्या सुरक्षा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सी.सी.टि.व्ही. लावण्यात आले असून याव्दारे पोलीस विभागाचे गर्दीवर बारीक लक्ष असणार आहे.

श्रीमूर्ती विसर्जनाकरिता विसर्जनस्थळी मध्यम व मोठ्या तराफ्यांची तसेच मोठ्या मूर्ती विसर्जनासाठी येतात अशा विसर्जन स्थळांवर फोर्कलिफ्ट / क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. कोपरखैरणे से-19 येथील धारण तलावावर अत्याधुनिक यांत्रिकी तराफ्याची व्यवस्था करण्यात आली असून आकाराने मोठया श्रीमूर्ती विसर्जनासाठी या यांत्रिकी तराफ्याचा श्रम व वेळ वाचण्यात मोठया प्रमाणात उपयोग होणार आहे.

नागरिकांमार्फत श्रीमूर्तींसोबत विसर्जन स्थळी आणले जाणारे पुष्पमाळा, फुले, दुर्वा, शमी यासारखे पुनर्प्रक्रिया करण्यायोगे “ओले निर्माल्य” त्यासाठी स्वतंत्रपणे ठेवलेल्या निर्माल्य कलशातच टाकावे तसेच मूर्तीच्या गळ्यातील कंठी, सजावटीचे सामान असे सुके निर्माल्य स्वतंत्र कलशात टाकावे, आणि कोणत्याही परिस्थितीत या वस्तू पाण्यात टाकू नयेत अशाप्रकारे महानगरपालिकेमार्फत करण्यात येणा-या आवाहनाला भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या निर्माल्याची वाहतूक करण्यासाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था करण्यात आलेली असून हे संकलित निर्माल्य महानगरपालिकेच्या तुर्भे प्रकल्पस्थळी विशेष वाहनाव्दारे वाहून नेले जात आहे व त्याचे पावित्र्य जपत त्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे.

वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये श्रीगणेश विसर्जन सोहळा पाहण्यासाठी दरवर्षी नागरिकांची मोठ्या प्रमाणात होणारा गर्दी लक्षात घेऊन महानगरपालिका व पोलीस यांच्यामार्फत सुयोग्य व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याठिकाणी उभारण्यात येत असलेल्या मोठ्या मंचावरून विसर्जन स्थळाकडे प्रस्थान करणा-या श्रीगणेश मूर्तींवर पृष्पवृष्टी करण्यात येणार आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ठराविक पक्षाच्या फायद्यासाठी प्रभाग रचना