कोकण वसाहत पुनर्वसन बाधितांचे उपोषण सुरुच
कल्याण : कल्याण पश्चिमेतील म्हाडा अंतर्गत कोकण वसाहत रहिवाशांच्या पुनर्वसन प्रकल्पात विकासकाने १५वर्षे होऊन देखील हक्काची घरे दिली नाहीत. घरभाडे दिले नाही. यासाठी विकासकावर गुन्हे दाखल करण्यासाठी बाधित रहिवाशांना हक्काची घरे मिळण्यासाठी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी बाधित रहिवाशांसमवेत उपजिल्हाधिकारी कार्यालयालगत बेमुदत आमरण उपोषण सुरु केले आहे. ५ ऑगस्ट रोजी तिसऱ्या दिवशी देखील त्यांचे आमरण उपोषण सुरुच असून या उपोषणकर्त्यांमधील काहींची प्रकृती खालावली आहे. तर आमचे जे व्हायचे ते इथेच होईल, आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय उठणार नसल्याची भूमिका या आंदोलनकर्त्यांची असल्याचे नरेंद्र पवार यांनी सांगितले.
आमरण उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी प्रसिध्दी माध्यमांना सामोरे जाताना पवार यांनी सांगितले की, प्रामुख्याने बिल्डरने १५ वर्षापासून घरे दिलेली नाहीत, ४ वर्षांपासून घरभाडे दिले जात नाही. शिवाय बँकेचे ३५० कोटी लोन घेतले, सेलेबेलचे १५० कोटी असे एंकदरीत ५०० कोटी रुपये आले ते कुठे आहेत शोधण्यासाठी, यासाठी बिल्डरवर गुन्हे दाखल करावेत, चौकशी करावी. तसेच यात कोणाचे हात बरबटले आहेत, ते चौकशीत सामारे येईल. या संदर्भात आमची आग्रही मागणी बिल्डर, बिल्डरचे पार्टनर, त्यांना मदत करणारे जुन्या कमिटीतील सदस्य यांच्यावर गुन्हे दाखल करीत अटक करावी, चौकशी करावी.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्तांना फोन करुन सांगून देखील कारवाई होत नाही. शासन सांगते; पंरतु प्रशासन हालत नाही. कुठल्याही प्रकारचा एफआयआर केला जात नाही. त्यामुळे आम्ही आमरण उपोषणाला बसलो आहोत. ३ दिवसांच्या उपोषणात माझी देखील प्रकृती ढासळत आहे. माझ्याबरोबर बसलेल्यांची प्रकृती बिघडत आहे. डॉक्टरांनी गोळ्या घेण्यास सांगितले आहे. पंरतु, आम्ही निश्चयावर ठाम असून पाण्याचा घोट देखील पिणार नाही. आम्हाला काय व्हायचे ते होऊदे, असे नरेंद्र पवार यांनी सांगितले. तर अद्याप देखील प्रशासनाच्या वरिष्ठ पातळीवर दखल घेतली जात नसल्याची खंतही नरेंद्र पवार यांनी व्यक्त केली.
दरम्यान, या आंदोलन स्थळी भाजपा जिल्हा अध्यक्ष नंदू परब यांनी भेट देत विचारपूस केली. भाजपा प्रदेश अध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांनीही फोन करुन विचारपूस केली आहे. तर आमरण उपोषणाला बाधित कुटुंबातील महिला वर्गाने रडत रडत आमची फरफट, वनवास कधी थांबणार? आम्हाला आमची हक्काची घरे कधी मिळणार? अशी आर्त साद दिली आहे.