अनेक जिल्ह्यामध्ये अधिकारी वर्षानुवर्षे एकाच जागी; बदली न करता निवडणूक प्रक्रियेला बाधा
उत्सव गणरायाचा जागर पर्यावरणाचा
पनवेल : पनवेल महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या माध्यमातून पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करण्याकरिता आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘उत्सव गणरायाचा जागर पर्यावरणाचा' या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. या माझी वसुंधरा ६.० उपक्रमांतर्गत विविध अभिनव उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पर्यावरणपूरक गणेश उत्सव करण्यासाठी पनवेल महापालिकेने सप्तसुत्री प्रसिध्द केली होती. या सप्तसुत्रीचा अवलंब करून नागरिकांनी गणेशोत्सव पर्यावरण पूरक पध्दतीने साजरा करण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले होते. तसेच या सप्तसुत्रीसाठी पनवेल महापालिकेच्या माध्यमातून या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले होते, ज्यामध्ये सप्तसुत्रीचे सर्टिफिकेट प्रमाणपत्र डाऊनलोड करण्याचा सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
उपायुक्त स्वरुप खारगे यांच्या सूचनेनुसार पर्यावरणपूरक गणेश उत्सवास प्रोत्साहन देण्याच्यादृष्टीने पर्यावरणपूरक गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये घरगुती गणेशोत्सव आणि सार्वजनिक गणेशोत्सव अशा दोन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये एकूण १ लाख रुपयांची बक्षीसे ठेवण्यात आली होती. नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा यासाठी सदर उपक्रमांतर्गत महापालिकेने प्रियदर्शनी इंदलकर आणि ओंकार राऊत या दोन मराठी अभिनेत्यासह आणि १० सोशल मिडिया इन्पलुअर्सच्या व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावरुन तसेच जागोजागी बॅनर्सच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली होती. पर्यावरणपूरक गणेशोत्सव सजावट स्पर्धेंतर्गत घरगुती विभागामध्ये सुमारे जवळपास ४९०नागरिकांनी सहभाग घेतला.सार्वजनिक गणेश उत्सव मंडळामध्ये १०४ मंडळांनी सहभाग घेतला. पर्यावरणपूरक गणोशोत्सवास प्राधान्य देण्यासाठी महापालिका क्षेत्रातील गणेश मूर्तीकारांना ३४ टन शाडू मातीचे वितरण केले.
महापालिकेचे मिशन ५०...
गृहनिर्माण संस्थेमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव जनजागृती करण्याकरिता मिशन ५० नावाचा उपक्रम राबविण्यात आला. ज्यामध्ये ५० सोसायटीमध्ये पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्याकरिता बैठक तसेच एकूण ५० परिसंवाद आणि १०० चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आल्या. या उपक्रमाच्या कालावधीदरम्यान माझी वसुंधरा अभियान अंतर्गत माहिती प्रसारित करण्याकरिता नागरिकांना पर्यावरण संरक्षणाची प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन करण्यात आले होते, यात ५ हजारांहून अधिक नागरिकांनी प्रतिज्ञा घेतल्या आहेत.