महापालिका वर्षा मॅरेथॉन कक्ष कार्यालयाचे उदघाटन
ठाणे : ठाणे महापालिकेच्यावतीने येत्या १० ऑगस्ट २०२५ रोजी होणाऱ्या ठाणे महापालिका वर्षा मॅरेथॉन स्पर्धेच्या कार्यालयाचे उद्घाटन १४ जुलै रोजी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते झाले. ‘मॅरेथॉन ठाण्याची...ऊर्जा तरुणाईची' असे यंदाच्या मॅरेथॉन स्पर्धेचे सूत्र आहे. स्पर्धकांना नोंदणी करता यावी तसेच स्पर्धेबाबत मार्गदर्शन मिळावे यासाठी ठाणे महापालिकेतील पहिल्या मजल्यावरील धर्मवीर आनंद दिघे सभागृहात मॅरेथॉन कार्यालय सुरू करण्यात आले आहे.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त-१ संदीप माळवी, अतिरिक्त आयुवत-२ प्रशांत रोडे, नगरअभियंता प्रशांत सोनग्रा, उपायुक्त मनिष जोशी, मीनल पालांडे, ‘ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन'चे पदाधिकारी, ठाणेकर ज्येष्ठ नागरिक, शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘कोव्हीड'च्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका वर्षा मॅरेथॉन घेण्यात आली नव्हती. तद्नंतर ६ वर्षानंतर मॅरेथॉन होत असल्याने ठाणेकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या स्पर्धेत मुंबई ठाण्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातून अनेक स्पर्धक सहभागी होत असतात. त्याचप्रमाणे आर्मी मधील नामवंत खेळाडू सहभागी होत असतात. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना मॅरेथॉन स्पर्धेची संपूर्ण माहिती मिळावी. तसेच स्पर्धेचे प्रवेश अर्ज, चेस्ट नंबर आदि अनुषंगिक कामांची पूर्तता ‘मॅरेथॉन'च्या कार्यालयात करण्यात येणार असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले. यावेळी ‘वर्षा मॅरेथॉन'च्या बोधचिन्हाचे अनावरण आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले. तसेच ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी यांना स्पर्धेचे अर्ज वाटप करण्यात आले.
मॅरेथॉन स्पर्धेत जिल्ह्यातील शालेय विद्यार्थी मोठया संख्येने सहभागी होणार असून स्पर्धकांची नोंद करता यावी. तसेच स्पर्धकांना माहिती मिळून संपर्क साधता यावा यासाठी सदर कार्यालय सुरू करण्यात आले आहे. तसेच स्पर्धेबाबतच्या बैठकाही या कार्यालयात होणार आहेत. शालेय विद्यार्थ्यापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यत विविध १२ गटात स्पर्धा होणार आहे.
या स्पर्धेत ३० हजाराहून नागरिक, ठाणे शहरातील शाळांमधील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, सेलिब्रेटी, लोकप्रतिनिधी सहभागी होणार असून ठाणेकरांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.
यावेळी ‘ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन'चे उपाध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, कृष्णकुमार कोळी, सचिव अशोक आहेर, खजिनदार भूपेंद्र ठाणेकर, सदस्य एकनाथ पवळे, सचिन मराठे, सुशांत पाटील आदि उपस्थित होते.