कल्याण पश्चिमेतही ‘वंदे मातरम्‌'चा उत्सव साजरा करणार - नरेंद्र पवार

कल्याण : भारताचे राष्ट्रगीत ‘वंदे मातरम्‌'ला यंदा १५० वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्त संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कल्याण पश्चिममध्ये वंदे मातरम्‌ उत्सव साजरा करण्याचे जाहीर केले आहे. तसेच कल्याणातील प्रत्येक नागरिकानेही आपापल्या स्तरावर राष्ट्रगीताला अभिवादन करण्याचे आवाहनही नरेंद्र पवार यांनी केले आहे.

२६ ऑक्टोबर रोजी प्रसारीत झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात' कार्यक्रमात संस्कृत भाषेचे पुनरुज्जीवन, सोशल मीडियावरील तरुणांचे योगदान आणि आदिवासी वीरांच्या पराक्रमांचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधला. कल्याण पश्चिम मधील ‘भाजपा'चे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने जनसंपर्क कार्यालयात आयोजित सार्वजनिक प्रक्षेपणाला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी जीएसटी बचत उत्सव, ऑपरेशन सिंदूर, स्वदेशी वस्तू आणि आत्मनिर्भर भारत याबाबत देशवासीयांना संबोधित केले.

देशाचे राष्ट्रगीत असलेले 'वंदे मातरम्‌' या गीताला यंदा ७ नोव्हेंबर रोजी १५० वर्षे पूर्ण होत आहेत. ते केवळ एक गीत नाही, तर ते एक ऊर्जास्त्रोत आहे, ज्याने कोट्यवधी भारतीयांना देशभक्तीच्या भावनेने प्रेरित केले आहे. आजही सदर गीत आपल्याला राष्ट्रसेवेची आणि मातृभूमीप्रती निष्ठेची जाणीव करुन देत आहे. त्यामुळे या राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ संपूर्ण देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले.

हॅशटॅग वंदे मातरम्‌ १५० या नावाने देशातील जनतेने आपल्याला यासंदर्भातील सूचना पाठवण्यासह पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले. तर सणासुदीच्या काळात बाजारात स्वदेशी वस्तुंच्या खरेदीत मोठी वाढ झाली असून ती सुखद गोष्ट असल्याची भावनाही मोदी यांनी यावेळी व्यक्त केली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

घोडबंदर किल्ल्यावरील भगवा झेंडा जीर्णावस्थेत