विद्यार्थिनीच्या अपहरणाचा प्रयत्न
भिवंडी : अल्पवयीन शाळकरी मुलीच्या अपहरणाच्या प्रयत्नातील रिक्षा चालकास ताब्यात घेऊन बेड्या ठोकण्यात शांतीनगर पोलिसांना यश आले आहे. असगर अली शाबीर अली शेख (३५) असे अटक केलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. तर पोलीस त्याच्या साथीदाराचा शोध पोलिस घेत आहेत.
शहरातील फातिमा नगर परिसरात राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन तरुणी ९ जुलै रोजी दुपारी १२ वाजता शाळेत जाण्यासाठी रिक्षाने निघाली असता रिक्षा रामनगर येथील पाण्याच्या टाकी जवळील शाळेजवळ आली असता विद्यार्थिनीने सांगूनही चालक असगर शेख याने रिक्षा न थांबविता ती पुढील बाजुस नेऊन या मुलीस जबदरस्तीने पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी प्रसंगावधान राखत सदर विद्यार्थिनीने कंपास पेटीमध्ये असलेल्या कर्कटकने असगर शेख याला मारला आणि शेजारील बसलेल्या आरोपीच्या साथीदारास धक्का मारुन रिक्षातून उडी मारून स्वतःची सुटका करून घेत शाळा गाठली होती. त्यानंतर घरी आल्यावर तिने आपल्यासोबत घडलेली आपबिती आई-वडिलांना सांगितली.
त्यानंतर ११ जुलै रोजी सदर विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर अज्ञात रिक्षा चालक आणि त्याचा साथीदार अशा दोघां विरोधात गुन्हा दाखल करुन पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून विद्यार्थिनीने दिलेल्या वर्णनावरुन रिक्षा चालकाचा शोध सुरू केला होता. त्यातच या गुन्ह्याचा तपास सुरु असताना परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी १३ जुलै रोजी फातिमानगर येथे सापळा रचून रिक्षा चालक असगर शेख याला ताब्यात घेऊन अटक केली. रिक्षा चालक शेख देखील त्याच परिसरात राहत असल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलीस आता त्याच्या साथीदाराचा शोध घेत आहेत.
दुसरीकडे रिक्षा चालक असगर शेख याने सदर विद्यार्थिनीच्या अपहरणाचा प्रयत्न का आणि कशासाठी केला? याबाबत पोलीस तपास करीत आहेत. सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त शशीकांत बोराटे, शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक (प्रशासन) विनोद पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अतुल अड्डुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश गायकर, पोलीस उपनिरीक्षक कालु गवारी, पोलीस हवालदार संतोष पवार, संतोष मोरे, पोलीस नाईक दिनेश भुरकुड, किरण जाधव, पोलीस शिपाई रवि पाटील, गणेश कांबळे आदिंच्या पथकाने केली आहे. जाधव, पोशि रवि पाटील, गणेश कांबळे आदि पोलिस पथकाने केली आहे.