कल्याण भांडुप परिमंडलातील १६,२४९ वीज ग्राहकांना अभय
कल्याण : थकबाकीमुळे वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडीत केलेल्या कल्याण आणि भांडुप परिमंडलातील १६,२४९ ग्राहकांनी ‘महावितरण'च्या ‘अभय योजना'चा लाभ घेतला आहे. ३५ कोटी १३ लाख रुपयांच्या थकबाकीचा भरणा करत ग्राहकांनी थकीत रवकमेवर विलंब आकार आणि व्याजमाफीसह मूळ थकबाकीत ५ ते १० टक्क्यांची सवलत मिळवली. दरम्यान, येत्या मार्च अखेरीस ‘अभय योजना'ची मुदत संपत असून लाभापासून वंचित दोन्ही परिमंडलातील उर्वरित ग्राहकांनी तत्काळ ऑनलाईन अर्ज करुन ‘योजना'चा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘महावितरण'ने केले आहे.
‘अभय योजना'नुसार मार्च-२०२४ अखेर किंवा तत्पूर्वी वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडीत झालेले लघुदाब आणि उच्चदाब ग्राहक (सार्वजनिक पाणीपुरवठा, कृषीपंप ग्राहक वगळून) ‘योजना'च्या लाभासाठी पात्र आहेत. थकबाकीची मुळ रक्कम एकरकमी किंवा ६ समान हप्त्यात भरल्यास त्यावरील व्याज आणि विलंब आकार पूर्णतः माफ होत आहे. योजनेतील सहभागी ग्राहकांना एकरकमी किंवा ६ समान हप्त्यात मूळ थकबाकी भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तर थकबाकी एकरकमी भरणाऱ्या उच्चदाब ग्राहकांना मुळ थकबाकीवर ५ टक्के आणि लघुदाब ग्राहकांना १० टक्के अतिरिक्त सवलत देण्यात येते. मुळ थकबाकी एकरकमी अथवा ३० टक्के रक्कम भरुन ‘अभय योजना'मध्ये सहभागी होता येईल. त्यानंतर मागणीप्रमाणे तत्काळ पुनःर्जोडणी अथवा नवीन वीजजोडणी मिळेल. त्यासाठी पात्र ग्राहकांनी https://wss.mahadiscom.in/wss/wss या पोर्टलवर केवळ ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावयाचा आहे.
कल्याण परिमंडलातील ११,२७० ग्राहकांनी ‘अभय योजना'मध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज केला आहे. यातील ९,९६५ ग्राहकांनी आत्तापर्यंत १७ कोटी ५३ लाख रुपयांचा भरणा केला असून त्यातील मागणी करणाऱ्या ६,१२४ जणांना पुनःर्जोडणी अथवा नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे. तर भांडुप परिमंडलातील ६,८६२ ग्राहकांनी ‘अभय योजना'मध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज केला आहे. यातील ६,२८४ ग्राहकांनी आत्तापर्यंत १७ कोटी ६० लाख रुपयांचा भरणा केला असून त्यापैकी २,८८८ जणांना त्यांच्या मागणीप्रमाणे पुनःर्जोडणी किंवा नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया मागणी सुरु आहे.