आज १० हजार बॉक्स हापूस आंब्याची पहिली खेप सातासमुद्रपार

वाशी : वाशी मधील एपीएमसी फळ बाजारात गुढीपाडवा नंतर हापूस आंब्याची आवक वाढत चालली असून, परदेशातून देखील हापूस आंब्याची मागणी होत आहे. त्यामुळे वाशी मधील ‘महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ'च्या प्रमुख निर्यात सुविधा केंद्रात अमेरिकेचे निरीक्षक दाखल झाले असून, हापूस आंबा निरीक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. हापूस आंब्याचे डोज मॅपिंग करुन आज ३ एप्रिल पासून हापूस आंबा निर्यातीला सुरुवात होणार आहे. पहिल्या खेपेत जवळ जवळ १० हजार बॉक्स हापूस आंब्याची परदेशात निर्यात होणार आहे.

भारत देशातील हापूस आंबा खवय्यांप्रमाणे परदेशात देखील हापूस आंब्याला पसंती दिली जात आहे. मात्र, परदेशी बाजारपेठेत हापूस निर्यात करण्यासाठी त्याचा दर्जा टिकवून ठेवण्याची भूमिका महत्वाची असते. विविध प्रक्रिया करुन, आंब्याची गुणवत्ता तपासणी करुन ,विशिष्ट तापमान ठेवून दीर्घकाळ टिकण्यासाठी विविध प्रक्रियेतून हापूस आंब्याला जावे लागते. त्यानंतर हापूस आंब्याची निर्यात करण्यात येते. परदेशात आंबा निर्यात करण्यासाठी नियमांच्या चौकटीतून आंबा निर्यात करावी लागते. आंबा निर्यातीकरीता आंब्याचा आकार, वजन आणि दर्जा महत्वाचा असतो. आखाती देश, लंडन, ऑस्ट्रेलिया, कुवेत, युरोपियन देश, जपान, साऊथ कोरिया याठिकाणी हापूस आंब्याची निर्यात होते. यंदा महाराष्ट्र शासनाच्या कृषि पणन मंडळ निर्यात केंद्रातून ४ हजार टन हापूस आंब्याची निर्यात करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे डोज मॅपिंग कसोटी पार केल्याने आज ३ एप्रिल रोजी १० हजार बॉक्स हापूस आंब्याची पहिली खेप परदेशात निर्यात होणार आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सिडकोचे जाचक हस्तांतरण शुल्क रद्द करून घरे फ्री होल्ड करावीत