आंदोलनाच्या सांगतेनंतर पहाटेपर्यंत स्पेशल क्लिनींग ड्राईव्ह
नवी मुंबई : मुंबईमध्ये आझाद मैदान येथे सुरु असलेल्या ‘मराठा आंदोलन'च्या पार्श्वभूमीवर आंदोलक मोठया संख्येने नवी मुंबईत वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटर आणि इतर ठिकाणी थांबलेले होते. २ सप्टेंबर रोजी आंदोलनाची सांगता झाल्यानंतर आंदोलनकर्ते मराठा बांधव आपापल्या गावाकडे परतले. राज्याच्या इतर भागांतून एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने नागरिक नवी मुंबईमध्ये आल्याने शहर स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिले होते. त्या अनुषंगाने दैनंदिन स्वच्छता कार्यात या भागात विशेष स्वच्छता पथके तैनात करण्यात आली होती.
त्याचप्रमाणे आंदोलनाची सांगता झाल्यानंतर आयुक्तांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली घनकचरा व्यवस्थापन विभाग उपायुक्त डॉ. अजय गडदे यांच्या माध्यमातून २ सप्टेंबर रोजी रात्रीपासून पहाटे ४ वाजेपर्यंत या भागात स्पेशल क्लिनींग ड्राईव्ह राबविण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने सिडको एक्झिबिशन सेंटर आणि त्याच्या लगतचा परिसर तसेच सेवटर-३० वाशी, तुंगा हॉटेल आसपासचा परिसर आणि सायन-पनवेल हायवे परिसर याठिकाणी सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत १०० हून अधिक स्वच्छताकर्मी, स्वच्छता अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षक तसेच २ यांत्रिकी सफाई मशीन, ३ सिव्हरेज जेटिंग मशीन तसेच कचरा संकलन आणि वाहतूक करणारी वाहने यांच्या माध्यमातून २१ टन इतक्या मोठ्या संख्येने कचरा संकलित करण्यात आला. यानंतर तो तुर्भे येथील प्रकल्पस्थळी वाहून नेण्यात आला.
आंदोलन संपल्यानंतर तत्परतेने रात्रीच सदर विशेष मोहीम हाती घेऊन पहाटे ४ पर्यंत अथक काम करुन दुसऱ्या दिवसाचा सूर्य उगविण्यापूर्वीच सदर संपूर्ण परिसर नेहमीसारखा स्वच्छ केल्याने त्या परिसरात मॉर्निंग वॉकला तसेच कामासाठी जाणाऱ्या नागरिकांकडून ‘नमुंमपा'च्या तत्पर स्वच्छता कार्याची प्रशंसा करण्यात आली.