मिरा-भाईंदरला ई-ऑफिस राज्यस्तरीय तृतीय क्रमांकाचा पुरस्कार

भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेने ई-ऑफिस क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय आणि प्रभावी कार्यामुळे राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान-स्पर्धा २०२५-२६ अंतर्गत तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. २१ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा आणि माहिती-तंत्रज्ञान विभागाचे सिस्टीम मॅनेजर राज घरत यांनी  पुरस्कार स्वीकारला.
केंद्र शासनाच्या डिजीटल भारत अभियान अंतर्गत ई-ऑफिस प्रणाली महापालिकेत यशस्वीपणे कार्यान्वित करण्यात येऊन अवघ्या ६० दिवसांत सर्व विभागांमध्ये १०० टक्के ई-ऑफिस अमलात आणणारी मिरा-भाईंदर महाराष्ट्रातील पहिली महापालिका ठरुन तसे प्रमाणपत्रही महापालिकेला प्राप्त झाले होते. ई-ऑफिस प्रणालीमुळे महापालिकेतील दैनंदिन कामकाज, पत्रव्यवहार, फाईल हालचाल, मंजुरी प्रक्रिया तसेच नोंद व्यवस्थापन पूर्णपणे डिजिटल स्वरुपात पार पडत आहे. यामुळे माहिती सुरक्षित, शोधण्यायोग्य आणि तत्काळ उपलब्ध होत असून कामकाज अधिक सुसूत्र आणि गतिमान झाले आहे.
आतापर्यंत १.४९ लाखांहून अधिक प्राप्त नोंदी तसेच ८,८०० पेक्षा अधिक फाईल्स डिजिटल पध्दतीने हाताळण्यात आल्या असून प्राप्त नोंदींपैकी सुमारे ९० टक्के नोंदींचा निपटारा ३ दिवसांच्या आत होत आहे. तर फाईल निपटारा सरासरी ७ दिवसांत पूर्ण केला जात आहे. पेपरलेस प्रणालीमुळे कागद, वेळ वाचून सुमारे ४ कोटीं पेक्षा अधिक आर्थिक बचत साध्य झाली आहे. महापालिकेच्या या उल्लेखनीय आणि प्रभावी कार्यामुळे राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान आणि स्पर्धा २०२५-२६ अंतर्गत तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली