सिडको पार्किंगमध्ये लागलेल्या आगीत २ गाड्या जळून खाक

 

नवी मुंबई : बेलापूर येथील सिडको कार्यालयासमोरील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दोन इनोव्हा कारला आग लागल्याची घटना पावारी दुपारी घडली. या आगीत दोन्ही कार जळाल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी याठिकाणी धाव घेऊन अर्ध्या तासात येथील आग आटोक्यात आणली. या पार्किंग लगतच्या गवताला लागलेल्या आगीमुळे तेथे उभ्या असलेल्या दोन्ही कारने पेट घेतल्याचे प्राथमिक चौकशीत आढळुन आले आहे.  

सिडको मुख्यालयासमोरील टाटा पॉवरच्या उच्च दाबाच्या वाहिन्यांखाली गेल्या काही वर्षापासून अनधिकृत पार्किंग सुरु करण्यात आली आहे. या पार्किंग लगत मोठ्या प्रमाणात गवत व झाडे झुडपे असून याच गवताला पावारी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास आग लागली. बघता बघता ही आग त्याठिकाणी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दोन इनोव्हा कारला लागल्याने या दोन्ही कारने पेट घेतला. या आगीची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत आगीमुळे दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.  

दरम्यान, सिडकोच्या या पार्कींगमध्ये शेकडो गाड्या दरदिवशी पार्क केल्या जातात. अनेक कार चालक या कारमध्ये आराम करत असतात, तसेच काही कर्मचारी हे सिगारेट फुंकण्यासाठी या पार्किंगमध्ये जात असतात, त्यांच्यापैकीच कुणीतरी सिगारेटचे जळते   थोटके टाकले असावेत, त्यामुळे या ठिकाणी आग लागली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सीबीडी पोलीस ठाण्यात या आगीची नोंद करण्यात आली आहे.

बेकायदेशीर पार्किंग केले जात असल्याचा सजग मंचचा आरोप  
सिडको पार्किंगमध्ये गाड्यांना लागलेल्या आगीत जीवित हानी टळली खरी. परंतु भविष्यात अशाच प्रकारे आगीच्या घटनेतून जीवित हानी झाल्यास त्यास जबाबदार कोण राहणार असा प्रश्न सजग नागरिक मंचाच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे. खरं तर सिडकोने उभारलेली ही पार्किंग व्यवस्था बेकायदेशीर असून वारंवार या अनाधिकृत पार्किंगचा मुद्दा सिडको, महानगरपालिका प्रशासन आणि वाहतूक विभाग यांच्याकडे उपस्थित करुनही त्याबाबत कोणतीच कारवाईक होत नसल्याबद्दल सजग नागरिक मंचच्या पदाधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

जपानी अधिकाऱ्यांकडून ‘ठाणे स्मार्ट सिटी' प्रकल्पांची माहिती