वटपौर्णिमा निमित्ताने ‘फणस'च्या मागणीत वाढ
वाशी : वटपौर्णिमा सण येत्या १० जून रोजी येत असल्याने घाऊक बाजारात कच्च्या फणसासोबत पिकलेल्या फणसाची चांगली आवक सुरु झाली आहे. त्यामुळे बाजारात फणसाचा गोड सुगंध सर्वांचे लक्ष वेधून घेत असून, फणसाच्या मागणीत वाढ होत असल्याचे चित्र बाजारात दिसत आहे.
आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुवासिनी दरवर्षी वटपौर्णिमा दिनी उपवास करतात. यानिमित्त महिला एकमेकींना फळाचे वाण देत असतात.या वाणात आंब्यासह फणसाच्या गरांना मोठे महत्त्व आहे. घरात गोडधोड पदार्थ म्हणून स्त्रिया बरका फणसाच्या पोळ्या बनवतात. तर कापा फणस वाण भरण्यासाठी वापरतात. याच पार्श्वभूमीवर वटपौर्णिमा दिवसाच्या तीन-चार दिवस आधीच कोकणातून मोठ्या प्रमाणात वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) घाऊक फळ बाजारात दाखल होण्यास सुरुवात.होते ७ जून रोजी एपीएमसी घाऊक फळ बाजारात १५ गाड्यांमधून एकूण १२५० क्विंटल फणस दाखल झाला. एपीएमसी घाऊक फळ बाजारात फणसाचे दर १५ ते २० रुपये किलो असले तरी किरकोळ बाजारात फणस नग प्रमाणे विकले जात आहेत. किरकोळ बाजारात साधारण ३०० ते ४०० रुपये नग फणसाची किंमत आहे, अशी माहिती फणस विक्रेत्यांनी दिली.