‘खारघर'चे पाणी ‘तळोजा'ला

पनवेल : खारघर वसाहतीतील ४० सेक्टर्सना दररोज ७५ एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. पण, शहराला ७२ एमएमएलडी इतकाच पाणीपुरवठा होत आहे. तळोजा वसाहतीला खारघरचे पाणी दिले जात असल्याने रहिवाशांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे स्वतःच्या मालकीचे धरण असूनही सिडको अखत्यारीत शहरांना पाणीपुरवठा करताना अडचणी येत आहेत. पनवेल महापालिकेत येणाऱ्या खारघरला पाणीपुरवठा करण्याचे काम ‘सिडको'तर्फे केले जाते.

‘सिडको'च्या हेटवणे, एमजेपी आणि नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणातून शहराची तहान भागते. सध्यस्थितीत शहराला ७५ एमएलडी पाण्याची गरज आहे; पण खारघरला सध्या ७२ एमएलडी पाण्याचा पुरवठा होत आहे. आठवड्यातून किमान ३ ते ४ दिवस शहराला पाणीपुरवठा होत नसल्याची रहिवाशांची ओरड आहे. व्हॅलिशिल्प, स्वप्नपूर्ती अशा मोठ्या गृहसंकुलांना त्याचा फटका बसत आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी सिडको तसेच रायगड भवन येथे हंडा मोर्चा काढत महिलावर्गाने अधिकाऱ्यांना फैलावर घेतले होते. त्यानंतर काही दिवस पाणीपुरवठा सुरळीत झाला होता. पण, पुन्हा तीच परिस्थिती उद्‌भवत असल्याने रहिवाशांमध्ये संतापाची लाट आहे.

खारघर शहराची व्याप्ती वाढत आहे. ओवा आणि पेठ गावांपासून ३० ते ३६ सेक्टरपर्यंत शहर विस्तारलेले आहे. या भागात १२ पासून ४२ आणि ५२ मजल्यांपर्यंत उंचीच्या नवीन इमारती आहेत. खारघर, सेक्टर-३७, ४० आणि ४२ मध्ये इमारतींची कामे सुरु आहेत. या इमारतीही १४ मजल्यांपेक्षा अधिक उंचीच्या आहेत. परंतु, नवीन जलवाहिन्या आणि अतिरिक्त पाणीपुरवठ्याची कोणतीही योजना ‘सिडको'ने तयार केलेली नाही.

खारघरनंतर तळोजा नोडमध्ये ‘सिडको'ने सुमारे २५ हजार घरे तयार केली आहेत. अलिकडच्या काळात १५ हजार घरे विक्रीकरिता उपलब्ध केली होती. मात्र, तळोजामध्ये तयार केलेल्या गृहप्रकल्पांना पाणीपुरवठा होत नसल्याने अनेक ग्राहकांनी ‘सिडको'च्या तळोजामधील घरांकडे पाठ फिरवली आहे. या भागातील रहिवासी सोसायट्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याची नामुष्की ‘सिडको'वर ओढवली आहे. दुसरीकडे व्हॅलिशिल्प, स्वप्नपूर्ती सोसायट्यांमध्ये आठवड्यातून ४ दिवस पाण्याची बोंब असल्याने अनेकांवर घरांच्या विक्रीची वेळ आली आहे.

टँकरचे भाव वधारले...
खारघर, तळोजा नोडमध्ये आठवड्यातून किमान ४ दिवस पाणीपुरवठा होत नाही. शहरातील जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी दर आठवड्याच्या सोमवारी शटडाऊन घेतला जातो. सोमवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होता. त्यानंतर खारघरला ७ दिवस पाणी देता येते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. परंतु, आठवड्यातून ४ दिवस पाणी येत नसल्याने रहिवाशांना टँकर मागवावा लागत आहे. ४५ हजार लिटरच्या एका टँकरसाठी २५ ते ३० हजार रुपये मोजावे लागत असल्याने टँकरविक्रेत्यांकडून वाढीव दराने पाणी विकले जात आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘ठामपा'च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा