तळोजा एमआयडीसी मधील रासायनिक, मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी  

पनवेल : पनवेल विधानसभा क्षेत्रातील तळोजा एमआयडीसी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या वायू आणि जलप्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर, तळोजा परिसरातील रासायनिक आणि मत्स्य प्रक्रिया उद्योगांचे कायमस्वरुपी स्थलांतर करुन या उद्योगांसाठी नवीन झोन तयार करावा, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पनवेल विधानसभा मतदारसंघात असलेल्या तळोजा एमआयडीसी मध्ये अभियांत्रिकी कंपन्यांसोबतच अनेक रासायनिक (केमिकल) तसेच काही मस्त्योद्योग प्रक्रिया कंपन्या आहेत. या कंपन्यांमार्फत मोठ्या प्रमाणावर वायू आणि जलप्रदूषण होत असून, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. तळोजा एमआयडीसीच्या चोहोबाजूंनी नागरी वस्ती मोठ्या प्रमाणावर वाढत असून, वसाहतीतील नागरिकांना प्रदूषणाचा खूप त्रास होत आहे. तळोजातील प्रदूषणाचा विषय आपण सातत्याने पत्रव्यवहाराद्वारे, बैठकांद्वारे शासनाकडे मांडला आहे. रासायनिक कंपन्यांमधून विशेषतः रात्री घातक वायू हवेत सोडले जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषित होत असून, नागरिकांना श्वसनाच्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. याशिवाय तळोजा मधील सर्व रासायनिक कंपन्यांतील रसायनमिश्रित दुषित पाणी तसेच सांडपाणी तळोजा परिसरांतील नद्यांमध्ये सोडले जाते. त्यामुळे नद्यांमधील जैवविविधता धोक्यात आली आहे.  याशिवाय मत्स्योद्योग प्रक्रिया कंपन्यांतर्फे देखील जल, वायू प्रदूषण होत आहे. या प्रक्रिया उद्योगांमुळे आजूबाजूच्या नागरिकांना दुर्गंधी तसेच वायू प्रदूषणाच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विविध ऋतुंमध्ये उन्हाळा, पावसाळा यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे मत्स्यप्रक्रिया उद्योगांतर्फे प्रदूषण होते. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. पनवेल आणि आजूबाजूच्या परिसरात सध्या खूप मोठ्या प्रमाणात विकासकामे चालू आहेत. याशिवाय पंतप्रधान आवास योजना अंतर्गत मोठ-मोठ्या गृहसंकुलांची कामे चालू आहेत. त्यामुळे भविष्यात तळोजा परिसरातील लोकसंख्या खूप वाढणार आहे. त्यादृष्टीने तळोजा मधील जल, वायू प्रदूषणावावत कायमस्वरुपी उपाययोजना होणे आवश्यक आहे, असे ना. उदय सामंत यांना दिलेल्या निवेदनात आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केले आहे.

तळोजा परिसरातील नागरिकांचे जगणे सुसह्य होण्यासाठी रासायनिक आणि मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे तळोजा एमआयडीसी मधून स्थलांतर करण्यासाठी या उद्योगांकरिता लोकवस्तीपासून दूर वेगळा झोन स्थापन करावा, याबाबत निर्णय करण्याच्या दृष्टीने बैठकीचे आयोजन करावे, अशी मागणीही ना. उदय सामंत यांना दिलेल्या निवेदनात आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

मनविसे पदाधिकारी-कार्यकर्ते भाजप मध्ये दाखल