खारघर पोलीस ठाणे मध्ये दर्शनी भागात शासकीय सेवांचे फलक; आवारात फुलपाखरु बाग
खारघर : खारघर पोलीस ठाणे मध्ये येणाऱ्या नागरिकांना त्यांच्या हक्कांची आणि शासकीय सेवांची माहिती सहजपणे मिळावी, या उद्देशाने लावण्यात आलेले शासकीय सेवांचे फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
प्रत्येक पोलीस ठाणे नागरिकांसाठी एक महत्त्वाचे केंद्र असून, सार्वजनिक कायदा-सुव्यवस्था राखणारे तसेच गुन्ह्यांचा तपास करुन नागरिकांना मदत करणारे महत्वाचे ठिकाण आहे.
दरम्यान, खारघर पोलीस ठाणे पनवेल तालुका हद्दीतील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले पोलीस ठाणे आहे. खारघर शहरात सर्व जाती-धार्मिय नागरिकांचे वास्तव्य असून, खारघर शहरांची लोकसंख्या पाच लाखांच्या घरात आहे. खारघर पोलीस ठाणे मध्ये तक्रार दाखल करण्यासाठी, माहिती देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम या कायद्यानुसार त्यांच्या हक्कांची आणि शासकीय सेवांची माहिती सहजपणे मिळावी याकरिता खारघर पोलीस ठाणे मध्ये दर्शनी भागात लोकसेवेचे तपशील, विहित काल मर्यादात होणाऱ्या कामांची माहिती दर्शविणारे फलक लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे शासकीय अधिसूचित सेवेचे नाव, सेवेसाठी आवश्यक कागदपत्रे आणि सेवेचा कालावधी, याशिवाय राष्ट्रीय-राज्य मानवी हक्क आयोग अधिकार अटकेच्या कार्यवाही बाबत सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना देणारे माहिती फलक तसेच राष्ट्रीय अनुसूचित जाती, जमाती प्रतिबंधक तरतूदीचे माहिती देणारे फलक, सायबर फ्रॉड,आपत्कालीन प्रतिसाद, अंमली पदार्थ विरोधी हेल्पलाईन,मोफत विधी सहाय्यता केंद्र,माहिती अधिकार तसेच पोलीस अधिकाऱ्यांचे नाव आणि त्यांचे पद दर्शविणारे फलक दर्शनी भागात लावण्यात आले आहेत. खारघर पोलीस ठाणे मध्ये प्रवेश करताच नागरिकांचे दर्शनी भागात लावण्यात आलेल्या शासकीय सेवांची माहिती देणाऱ्या फलकांकडे लक्ष जात आहे.
खारघर पोलीस ठाणे आवारात फुलपाखरांना आकर्षित करण्यासाठी बाग तयार करण्यात आली आहे. या बागेत फुलपाखरांना आवश्यक असलेल्या खाद्य आणि झाडांची लागवड करण्यात आली आहे. कोरांटी, पेटांस, कडीपत्ता, झेंडू, घोळ, जमैकन स्पाईक, मूसेंदा आदी विविध जातीच्या रोपांची लागवड खारघर पोलीस ठाणे आवारात करण्यात आली असून, या बागेबद्दल पर्यावरण प्रेमींकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
खारघर पोलीस ठाणे मध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी बैठक व्यवस्था असून, नागरिकांसाठी पोलीस ठाणे मध्ये अधिसूचित सेवेचे नाव आणि त्यासाठी आवश्यक लागणारे दस्तऐवज, कालावधी आदी विविध शासकीय सेवांची माहिती देणारे फलक दर्शनी भागात लावण्यात आले आहेत. या फलकावरील माहिती नागरिक त्यांच्या मोबाईल मधील कॅमेऱ्यात चित्रित करत असतात. खारघर पोलीस ठाणे मध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे काम वेळेत करावे, अशी सूचना पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना देण्यात आली आहे. - दीपक सुर्वे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक - खारघर पोलीस ठाणे.