दिल्ली मध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्षांची बैठक संपन्न
उलवे : दिल्ली मधील ‘इंदिरा भवन' मध्ये संसद मधील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल, सचिन पायलट यांच्या उपस्थितीत अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच काँग्रेस जिल्हाध्यक्षांची बैठक पार पडली.
विशेष म्हणजे या बैठकीस देशभरातील महाराष्ट्र, छत्तीसगड, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात राज्यातील ३५० जिल्हाध्यक्ष, अनेक राज्यांतील वरीष्ठ काँग्रेस वरिष्ठ नेते आणि निरीक्षक उपस्थित होते. या बैठकीत महाराष्ट्रातून विचार व्यक्त करण्याची संधी रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र घरत यांना मिळाली.
काँग्रेस जिल्हाध्यक्षांना विशेष अधिकार आणि आर्थिक ताकद दिली जाईल, सत्तेचे विकेंद्रीकरण केले जाईल, निवडणुकांचे अधिकार जिल्हाध्यक्षांना दिले जातील. काँग्रेस पक्षाच्या बळकटीकरणासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जातील. काँग्रेस पक्ष तळागाळात रुजविण्याबाबत जिल्हाध्यक्षांची भूमिका आगामी काळात महत्त्वाची असेल, असे या बैठकीत राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.
‘अनेक जण सर्व पदांचा लाभ घेऊन काँग्रेस पक्षाला सोडून गेले आहेत. पण, आमच्यासारखे असंख्य प्रामाणिक कार्यकर्ते पक्षाच्या मागे ठाम आहेत. देशात आता गांधीवाद शिल्लक राहील, विरोधकांनी कितीही आटापिटा केला तरी काँग्रेस पक्षाची विचारधारा मारण्याची ताकद विरोधकांमध्ये नाही', अशी घणाघाती तोफ या बैठकीत रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांनी डागली.
‘सर्व जाती-धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन केले. त्यांनी सर्व जाती-धर्मांच्या लोकांचा आदर केला, हीच काँग्रेसचीही विचारधारा आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे विचार लोकांना हवे आहेत. जिल्हाध्यक्षांना अधिकार दिल्याने काँग्रेस अधिक मजबूत होणार आहे. सर्वसामान्यांना फक्त उद्योजकांचा विचार करणारे सरकार नको आहे. काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांचा पक्ष आहे', असे दमदार विचार व्यक्त करत रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांची तोफ दिल्लीत धडाडली. या भाषणाबद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी महेंद्र घरत यांचे अभिनंदन आणि कौतुक केले.
या बैठकीत राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्षांचे विचार ऐकून घेतले. या बैठकीत प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मिलिंद पाडगावकर यांच्यासह राज्यातील अनेक वरिष्ठ काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.