नवी मुंबई पोलीस एक पाऊल पुढे
नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस दलाने नागरिकांशी समाज माध्यमाद्वारे संवाद साधण्याच्या प्रक्रियेत आणखी एक नवे पाऊल टाकले आहे. पोलिसांनी नागरिकांना घरबसल्या पोलीस दलाविषयी तसेच पोलिसांच्या कार्य पध्दतीविषयी कुठल्याही प्रकारची माहिती मिळवता यावी, यासाठी चॅटबोट सेवा सुरु केली आहे. त्यामुळे नागरिकांना नेहमी भेडसावणाऱ्या प्रश्नांची उत्तरे ‘चॅटबोट'द्वारे एका क्लिकवर मिळणार आहेत. चॅटबोट सेवा सुरु करणारे नवी मुंबई राज्यातील पहिले पोलीस आयुक्तालय ठरले आहे.
तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नागरिकांना सेवा-सुविधा देण्यामध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणण्यासाठी नवी मुंबई पोलीस दल कायम अग्रेसर राहिले आहे. सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यात नवी मुंबई पोलीस दलाने चॅटबोट सेवा सुरु करुन नागरिकांशी समाज माध्यमाद्वारे संवाद साधण्याच्या प्रक्रियेत आणखी एक नवे पाऊल टाकले आहे. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या प्रयत्नाने सुरु करण्यात आलेल्या या ‘चॅटबोट'चे उद्घाटन नुकतेच राज्याचे गृह राज्यमंत्री (शहरे) योगेश कदम यांच्या हस्ते झाले.
नवी मुंबई पोलिसांच्या अधिकृत वेबसाईटद्वारे नागरिकांना ‘चॅटबोट'ची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरिकांना पोलीस दलाशी संबंधित माहिती, कार्यपध्दती, तक्रार प्रक्रियेची माहिती तसेच विविध पोलिस सेवा याबाबत त्वरित मार्गदर्शन मिळणार आहे. सदर सेवा 2४/७ उपलब्ध असून, नागरिकांना त्यांच्या स्मार्टफोन, संगणक किंवा टॅबलेटवरुन या ‘चॅटबोट'द्वारे नवी मुंबई पोलिसांशी संवाद साधता येणार आहे. सदर उपक्रमामुळे नागरिकांना पोलीस स्टेशनमध्ये प्रत्यक्ष जाण्याची गरज न पडता अनेक शंका आणि चौकशी ‘चॅटबोट'द्वारे करता येणार आहे. विशेष म्हणजे इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेतून नागरिकांना संवाद साधता येणार आहे.
‘एआय चॅटबोट'चा वापर करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावर (navimumbaipolice.gov.in) उजव्या बाजुला खालील बाजुस नवी मुंबई पोलीस हेल्पवर क्लिक केल्यानंतर चॅटबॉट पेजवर जाता येणार आहे. या ‘चॅटबोट'मध्ये नागरिकांना पोलीस सेवांशी संबंधित प्रश्न विचारुन माहिती घेता येणार आहे. तसेच वरच्या बाजुला असलेल्या चॅट नाऊ वर क्लिक करुन चॅट ाॉट सोबत संवाद देखील साधता येणार आहे.
‘चॅटबोट'द्वारे मिळणाऱ्या सुविधा...
गुन्हे टाळण्यासाठी सुरक्षा टिप्स आणि सायबर सुरक्षा, फिशिंग, ऑनलाईन फसवणूक, चोरी, इत्यादी गुन्ह्यांवर प्रतिबंधक उपाय सांगितले जाणार आहे. तसेच नवीन गुन्हेगारी पध्दतींबद्दल नागरिकांना सतर्क केले जाणार आहे. पोलीस स्टेशनचे तपशील, केसची प्रगती, दस्तऐवज आवश्यकता, आदि माहिती सहज शोधता येणार आहे. ऑनलाईन एफआयआर, पासपोर्ट व्हेरिफिकेशन आणि इतर सेवांसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. नागरिकांना योग्य अधिकाऱ्यांशी किंवा विभागाशी जोडले जाणार आहे. पोलीस आणि नागरिक यांच्यात पारदर्शक संवाद वाढविण्यासाठी चॅटबॉट वापरला जाणार असून नागरिक त्यांच्या सूचना, तक्रारी किंवा प्रश्न थेट पोलिसांशी सामायिक करु शकणार आहेत.
नागरिकांना जलद, पारदर्शक आणि सहज सेवा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने चॅटबोट सेवा उपलब्ध करुन देण्यात आली असून या डिजीटल युगात पोलीस प्रशासनाकडून देखील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन नागरिकांसोबत सुसंवाद साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सदर सेवा व्हॉटस्ॲप, वेबसाईट किंवा विशेष ॲपद्वारे सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाशी लोकांचा संवाद अधिक खुला, विश्वासार्ह आणि कार्यक्षम होईल.
-संजयवुÀमार पाटील, पोलीस उपायुवत-मुख्यालय, नवी मुंबई.