गोवर्धनी माता मंदिराचा १८ वा जीर्णोध्दार सोहळा थाटामाटात संपन्न

नवी मुंबई : श्री कृष्णाष्टमी निमित्त बेलापूर किल्ले गांवठाण येथील आई गोवर्धनी माता मंदिराचा १८ वा जीर्णोध्दार सोहळा थाटामाटात संपन्न झाला. यावेळी मंदिरात शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. दरम्यान, सर्व भक्तांची सर्व संकटे दूर होऊन त्यांना सुख, शांती आणि समृध्दी जीवन लाभो, अशी प्रार्थना आई गोवर्धनी मातेला केली असल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले. 

नवी मुंबईतील सुमारे ३०० वर्षापूर्वीचे पुरातन पेशवेकालीन एकमेव मंदिर म्हणून आई गोवर्धनी माता मंदिराची आख्यायिका आहे. आई गोवर्धनी मातेची प्राणप्रतिष्ठापना पेशवेकाळात झाली असून नवी मुंबईतीलच नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशातील ठाणे, रायगड, पालघर, जिल्ह्यातील सर्व भाविक भक्तांना नवसाला पावणारी माता म्हणून प्रसिध्द आहे. तसेच नवी मुंबईच्या नावलौकीकाला साजेसे चिमाजी अप्पांपासून ३०० हून अधिक वर्षाच्या इतिहासाला उजाळा देणारे आई गोवर्धनी माता मंदिर आहे. नवी मुंबईतील सोनार, ब्राम्हण, आगरी-कोळ्यांची कुलदेवता असलेली आणि भक्तांच्या हाकेला धावणारी अशी देखील आई गोवर्धनी मातेची जनमाणसात ख्याती आहे. गोवर्धनी माता मंदिर निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या निसर्गरम्य टेकडीवर वसलेले असून हिरवळीने नटलेले आहे. मंदिराच्या पाठीमागे विस्तीर्ण असा समुद्र लाभलेला असून या पुरातन मंदिराचा जीर्णोध्दार १८ वर्षापूर्वी उद्योजक विजय नारायण म्हात्रे आणि आ. मंदाताई म्हात्रे यांच्या शुभहस्ते करण्यात आला होता.

यावेळी बेलापूर गावातील गोवर्धनी माता गोविंदा पथक आणि दारावे गावातील आई एकविरा गोविंदा पथक आई गोवर्धनी मातेचे दर्शन घेऊन मानाच्या दहीहंडी फोडण्यास रवाना झाले.

याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील, बेलापूर विधानसभा संयोजक तथा माजी नगरसेवक निलेश म्हात्रे, माजी नगरसेवक दिपक पवार, दत्ता घंगाळे, भाजपा वाशी मंडळ अध्यक्ष विकास सोरटे, समाजसेवक महेंद्र नाईक, कुंदन म्हात्रे, बेलापूर मंडळ अध्यक्ष अजय सिंग, संजय ओबेरॉय, विनायक गिरी, जयश्री चित्रे, मंगेश चव्हाण, जयंत पाटील, भरत मावळे, ज्योती पाटील, उज्ज्वला म्हात्रे, योगिता म्हात्रे, मालती सोनी, तेजल सालगावकर, कविता कथकधोंड, तसेच शेकडो भाविक उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘ठाणे'मध्ये १० थरांचा विश्वविक्रम