नक्षलविरोधी मोहिमेत उल्लेखनीय योगदान;
नवी मुंबई : गडचिरोली आणि गोंदिया जिह्यांत नक्षलवाद्यांच्या हिंसक व बेकायदेशीर कारवायांना आळा घालण्यासाठी नेमून दिलेले कार्य यशस्वीपणे पार पाडणाऱ्या पोलिस अधिकारी व अंमलदारांना विशेष सेवा पदक प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सन्मानाच्या यादीत नवी मुंबई पोलिस दलातील 2 सहाय्यक पोलीस आयुक्त आणि 3 पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश असून, त्यांचे कार्य राज्याच्या नक्षलविरोधी मोहिमेत मोलाचे ठरले आहे.
गडचिरोली व गोंदिया हे जिल्हे राज्यातील नक्षलवादाने सर्वाधिक प्रभावित भागांपैकी मानले जातात. येथे पोलिस दलाला सतत उच्च जोखमीच्या परिस्थितीत कार्य करावे लागते. अशा परिस्थितीत नक्षलवाद्यांच्या हिंसक व बेकायदेशीर कारवायांना आळा घालण्यासाठी नेमून दिलेले कार्य यशस्वीपणे पार पाडणाऱया 617 पोलिस अधिकारी व अंमलदारांचा विशेष सेवा पदक देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
नवी मुंबई पोलीस दलातील गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे, सीबीडी विभागाचे सहाय्यक आयुक्त मयुर भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक वैभव रुपवते (वाशी), पोलीस उपनिरीक्षक मयुर पवार (नेरुळ), पोलीस उपनिरीक्षक अभय काळे (कळंबोली) या पाच पोलीस अधिकाऱयांचा देखील विशेष सेवा पदक सन्मान यादीत समावेश आहे. या अधिकारी व अमलदारांनी ठरवून दिलेला कालावधी पूर्ण करताना नक्षलवाद्यांच्या कारवायांना आळा घालण्यात विशेष यश संपादन केले आहे. विशेष सेवा पदक जाहिर झालेल्या सर्व अधीकाऱयांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला यांनी यासंदर्भात आदेश जारी केले असून, लवकरच ही पदके संबंधित अधिकाऱयांना वितरित करण्यात येणार आहेत. पदके प्राप्त झाल्यानंतर सर्व घटक प्रमुख तसेच परिक्षेत्रीय विभाग प्रमुखांनी पदक प्रदान समारंभ आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.