खारघरमध्ये लवकरच अंतराळ संग्रहालय
पनवेल : मुंबईतील ‘नेहरु तारांगण'च्या धर्तीवर पनवेल महापालिका खारघर मध्ये लवकरच विज्ञान आणि अंतराळ संग्रहालय उभारणार आहे. जवळपास ४१.३४ कोटी रुपये खचर्ुन खारघर, सेवटर-३४ येथे उभारण्यात येणाऱ्या ‘अंतराळ संग्रहालय'च्या कामाला महापालिका प्रशासनाने मंजुरी दिली आहे. ‘अंतराळ संग्रहालय'मुळे ‘खारघर'चा नावलौकिक होणार आहे.
मुंबई येथील नेहरु तारांगण सेंटर खगोलशास्त्र आणि विज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी एक प्रमुख ठिकाण आहे. या सेंटरमध्ये शैक्षणिक मनोरंजनाच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टीकोन वाढविण्यासाठी विविध खगोलशास्त्रीय विषयांवर चर्चा आणि व्याख्याने आयोजित केली जातात. दरम्यान, सामान्य नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांना भारताच्या अंतराळ तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी आणि विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील आवड निर्माण करण्यासाठी पनवेल महापालिकेच्या माध्यमातून खारघर, सेक्टर-३४ एच मध्ये ३२,२६२.६१ चौरस मीटर जागेवर अंतराळ संग्रहालय उभारण्यात येणार आहे. या अंतराळ संग्रहालय उभारणीच्या ४१.३४ कोटी खर्चाच्या प्रस्तावास पनवेल महापालिका प्रशासनाने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी महापालिका आयुवत मंगेश चितळे यांनी पुढाकार घेतला आहे.
दरम्यान, भविष्यातील वैज्ञानिक पिढी घडवण्याच्या दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि अंतराळ संशोधनाची रुची निर्माण होण्यासाठी सदरचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असणार आहे. तसेच सामान्य नागरिकांनाही अंतराळाची माहिती होण्यासाठी अंतराळ संग्रहालय उपयुक्त ठरणार आहे. सर्वसाधारण प्रशासकीय सभेने या प्रकल्पास मान्यता दिली आहे. सदर प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे यांनी दिली.
‘अंतराळ संग्रहालय' वैशिष्ट्येः
३४८५.१० चौरस मीटर जागेवर तळघर, तळमजला आणि पहिला मजला अशी ‘अंतराळ संग्रहालय'ची भव्य आणि नाविन्यपूर्ण इमारत उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी प्रदर्शन भरविण्यासाठी मोठ्या प्रमाणात जागा ठेवण्यात आली असून १२० आणि २२० विद्यार्थी क्षमता असलेले मल्टीपर्पज सभागृह असणार आहे. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या जागेसाठी ‘सिडको'ने मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे सदर प्रकल्प सेंट्रल पार्क, खारघर कार्पोरेट आणि पेठ पाडा मेट्रो स्थानक पासून जवळ आहे.
महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर नाविन्यपूर्ण अंतराळ संग्रहालय उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाला प्रशासनाने मंजुरी दिली असून बांधकाम परवानगीसाठी ‘सिडको'कडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. परवानगी मिळाल्यानंतर निविदा काढून ‘अंतराळ संग्रहालय'च्या कामाला सुरुवात होणार आहे.
-संजय कटेकर, मुख्य अभियंता-पनवेल महापालिका.