सिडको घरांच्या किंमती कमी करा; अन्यथा उपमुख्यमंत्र्यांच्या घरावर धडक
नवी मुंबई : ‘सिडको'ने २६,००० घरांची काढलेल्या सोडतीमधील घरांच्या किंमती अत्यंत महाग असल्याने मागील अनेक महिन्यांपासून ‘मनसे'ने सिडको सोडतधारकांना सोबत घेऊन मोठा लढा उभा केला आहे. उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन वेळा बैठकीचे आश्वासन देऊन देखील बैठकीस येण्यास टाळले. एवढे महिने होऊन सुध्दा राज्य सरकार किंवा सिडको अजून घरांच्या किंमती कमी करत नाही. यासंबंधी मनसे प्रवक्ते तथा नवी मुंबई शहरअध्यक्ष गजानन काळे यांनी पत्रकार परिषद घेतली.
दरम्यान, सिडको सोडतधारकांचा संयमचा बांध आता सुटत चालला आहे. सिडको अजून सर्व सामान्यांची किती परीक्षा बघणार? असा प्रश्न विचारत राज्य सरकारने गणेशोत्सवापूर्वी या घरांच्या किंमती कमी नाही केल्या तर मनसे सिडको सोडत धारकांना घेऊन ठाणेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर धडकेल, असा इशारा गजानन काळे यांनी यावेळी दिला.
सत्ताधारी पक्षाचे आमदार प्रविण दरेकर, विक्रांत पाटील, राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे शशिकांत शिंदे यांनी सदर विषय अधिवेशनात मांडला. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या घरांच्या किंमती जास्त असल्याचे मान्य करत २० ते २५ टववयांनी घरांच्या किंमती कमी करु, असे सभागृहात मान्य केला असताना घरांच्या किंमती कमी का होत नाहीत? वनमंत्री गणेश नाईक दर आठवड्याला मंत्रिमंडळ बैठकीत देवेंद्र फडणवीस यांना भेटत असताना ते सदर प्रश्न मंत्रीमंडळ बैठकीत मांडून का सोडवत नाहीत? असा सवालही गजानन काळे यांनी उपस्थित केला. तरी घरांच्या किंमती कमी नाही झाल्या तर गणेशोत्सव काळात सुध्दा मनसे ठाणे येथे एकनाथ शिंदे यांच्या बंगल्याच्या बाहेर आंदोलन करेल, असा इशारा गजानन काळे यांनी दिला.
वाशी मधील ‘सिडको'च्या गृहनिर्माण प्रकल्पाची जागा वाहनतळासाठी आरक्षित असताना सिडको तिथे गरीबांसाठी घरे कसे बनवू शकते. जर इथे घरे बनवली आहेत तर या घरांच्या किंमती एवढ्या प्रचंड महाग का? तर दुसरीकडे बेलापूर, सेक्टर-१५ मध्ये ३०-४० कोटी रुपये खर्च करुन ६०० गाड्यांसाठी वाहनतळ तयार आहे. पण, वाहतूक कोंडी होत असताना बार आणि हॉटेल बाहेरील गाड्या इथे गाड्या पार्क करायला येत नाहीत. बार आणि हॉटेल मालकांच्या अर्थपूर्ण दबावामुळे विभाग अधिकारी अमोल पालवे आणि ट्रॅफिक अधिकारी रस्त्यावर उभ्या असणाऱ्या गाड्यावर तोडगा काढत नाहीत, असे गजानन काळे यांनी यावेळी सांगितले.
नेरुळ, सेक्टर-२८ मध्ये प्लॉट क्र.१२(अ), प्लॉट क्र.१२(ब), प्लॉट क्र.१२(क), प्लॉट क्र.१२(ड) या भूखंडावर महापालिका विकास आराखड्यात अनुक्रमे खेळाचे मैदान, ज्येष्ठ नागरिक-विकलांग, उद्यान, पोलीस स्थानक यासाठी आरक्षण आहे. असे असताना ‘सिडको'ने सदर भूखंड चढ्या भावाने बांधकाम व्यावसायिकांना विकले. मुळात महापालिका विकास आराखड्याला राज्य सरकारची मंजुरी असताना राज्य सरकारची संस्था सिडको या विकास आराखड्याला केराची टोपली दाखवून परस्पर भूखंड कसे विकू शकते? असा सवाल गजानन काळे यांनी विकास केला आहे. महापालिकेचा नगररचना विभाग कागदी घोडे नाचवण्याव्यतरिक्त ठोस काही कारवाई करणार की नाही? असा सवाल उपस्थित करत मनसे या भूखंडावर कोणतेही बांधकाम होऊ देणार नाही, असा इशाराही गजानन काळे यांनी दिला.
सदर पत्रकार परिषद प्रसंगी ‘मनसे'चे उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, शहर सहसचिव सचिन कदम, मनसे विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, रोजगार विभाग शहर अध्यक्ष सनप्रीत तुर्मेकर, चित्रपट सेना शहर अध्यक्ष अनिकेत पाटील यांच्यासह सिडको सोडतधारक उपस्थित होते.