‘केडीएमसी'च्या स्वच्छता मोहिमेत १३०० टन कचरा संकलन

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ७ प्रभागांसाठी अवघ्या २ महिन्यांपूर्वी प्रारंभ झालेल्या सुमित एल्कोप्लास्ट या खासगी संस्थेच्या स्वच्छता उपक्रमाचे सकारात्मक दृष्य परिणाम दिसू लागले आहेत. महापालिका प्रशासनाकडून या सातपैकी ड, जे आणि फ या ३ प्रभागांची हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाली असून उर्वरित ४ प्रभागांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर या तिन्ही प्रभाग क्षेत्रात राबवण्यात आलेल्या विशेष स्वच्छता मोहीमेंतर्गत (इनिशियल टोटल एरिया क्लिनिंग-इटाक) तब्बल १३०० टनांहून अधिक कचरा संकलन करण्यात आले आहे.

३ प्रभागांत परिणामकारक कचरा संकलन...
चेन्नई शहरातील ‘स्वच्छता पॅटर्न'च्या धर्तीवर ‘केडीएमसी'च्या १० पैकी ७ प्रभागांतील कचरा संकलन आणि वाहतुकीचे काम सुमित एल्कोप्लास्ट या खासगी संस्थेला देण्यात आले आहे. महापालिकेच्या अ, ब आणि क वगळता उर्वरित ७ प्रभाग क्षेत्रामध्ये स्वच्छतेचे काम सुरू करण्यात आले आहे. आजच्या तारखेपर्यंत ७ पैकी ड, जे आणि फ या तिन्ही प्रभागांमध्ये पूर्ण क्षमतेने कचरा संकलन आणि वाहतुकीचे काम सुरू करण्यात आले आहे. तर उर्वरित ४ प्रभागांची हस्तांतरण प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून ऑगस्ट अखेरपर्यंत ती पूर्ण होईल, असा विश्वास अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.

दररोज ३ सत्रात कचरा संकलन...
सध्याच्या घडीला या तिन्ही प्रभागांमध्ये दररोज सकाळी ६ ते २, दुपारी २ ते १० आणि रात्री १० ते सकाळी ६ अशा वेळापत्रकानुसार कचरा संकलनाचे काम केले जात आहे. तसेच लोकांना सदर वेळा माहिती होण्यासाठी, कचऱ्याचे ओला आणि सुका वर्गीकरणाबाबत जागृती करण्यासाठी, सुमित एल्कोप्लास्टमार्फत आयइसी (इन्फॉर्मेशन, एज्युकेशन आणि कम्युनिकेशन) टीम घरोघरी भेट देत आहे. तसेच कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्यांवरही स्पीकर यंत्रणा लावण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

स्वच्छता उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद...
सदर प्रभागातील काही ठिकाणी पूर्ण स्वच्छता करुनही त्यानंतर लोकांकडून सतत कचरा टाकण्यात येत असून अशा ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात कॉम्पॅक्टर कंटेनर ठेवण्यात आले आहेत. जेणेकरुन मोकळ्या जागेमध्ये पडणारा कचरा त्या कॉम्पॅक्टर कंटेनरमध्ये जाईल. त्यामुळे परिसर स्वच्छ राहण्यासह कचरा उचलणेही सोयीस्कर ठरेल, असे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी स्पष्ट केले. तसेच काही अपवाद वगळता ड, जे आणि फ प्रभागांमध्ये सुरु असलेल्या या स्वच्छता उपक्रमाला नागरिकांकडूनही मोठा प्रतिसाद मिळत असल्याने ‘कचरामुवती'च्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे, असे गायकवाड म्हणाले.

सर्वच प्रभागांमध्ये प्रभावी स्वच्छता...
तर उर्वरित ग आणि ह प्रभागाचे या महिन्याअखेरपर्यंत आणि उरलेले आय आणि जे प्रभागांची हस्तांतरण प्रक्रिया ऑगस्ट अखेरीपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी दिली आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यानंतर या सातही प्रभागांमध्ये अतिशय परिणामकारकपणे स्वच्छता दिसून येईल. तसेच सदर सात प्रभागांतील सफाई कर्मचारी-यंत्रणा अ, ब आणि क प्रभागांसाठी उपलब्ध होणार असल्याने या प्रभागांतही आणखी चांगली स्वच्छता राखली जाईल, असा विश्वासही अतिरिवत आयुवत गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ओला-उबेर चालकांचा बंद