भिवंडीमध्ये उभे राहणार ‘उर्दू घर'
भिवंडीः भिवंडीमध्ये लवकरच शानदार ‘उर्दू घर' उभे राहणार आहे. या प्रस्तावित उर्दू घरासाठी आवश्यक २५०० चौ. मी. भूखंड ठाणे जिल्हाधिकारी यांनी राज्याच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडे नुकताच सुपूर्द केला. भिवंडीमध्ये उर्दू घर उभे रहावे, यासाठी ‘भिवंडी पूर्व'चे आमदार रईस शेख सातत्याने पाठपुरावा र्कीत होते. आमदार शेख यांच्या ५ वर्षाच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार उर्दू भाषकांची १.२५ लक्ष लोकसंख्या असलेल्या परिसरात ‘उर्दू घर' उभारण्याची योजना राज्याच्या अल्पसंख्याक विभागाने २०२२ मध्ये आणली आहे. त्या निकषांमध्ये ठाणे जिल्ह्याचा समावेश होता. मात्र, भिवंडीचा उल्लेख नव्हता. भिवंडीमध्ये सर्वाधिक उर्दू भाषिक आहेत. भिवंडीमध्ये उर्दू घर उभे रहावे यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत होतो. दरम्यान, राज्यात ३ सरकारे बदलली गेली. चाविंद्रे ग्रुप ग्रामपंचायतमधील नागांव येथील जमीन उर्दू घरासाठी मिळाली. त्या जमिनीवर गुरचरण आरक्षण होते. ते आरक्षण हटवण्याच्या प्रक्रियेत यश आले.
अखेर अल्पसंख्याक विकास विभागाच्या नावे सीटी सर्वे क्रमांक ३०८७ ते ३१०१ मधील २५०० चौ. मी. जमिनीची फेरफार नोंद करण्यात आली. भिवंडी तहसीलदारांनी या भूखंडाचा अल्पसंख्याक विकास विभागाला सातबारा सुपूर्द केला. उर्दू घराचे बांधकाम जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याशी माझी चर्चा झाली. दिवाळीनंतर यासदंर्भात बैठक लावू आणि भिवंडीतील उर्दू घरासाठी पुरेसा निधी देऊ, असे आश्वासन ना. अजित पवार यांनी दिले आहे. या उर्दू घराचा आराखडा तयार आहे. मोठे प्रेक्षागृह, २ बैठक हॉल, महिलांसाठी विश्रामगृह, २ स्वच्छतागृहे, ग्रंथालय, व्यवस्थापक कक्ष, स्टोअर रुम, वाहनतळ, अल्पोपहार कॉर्नर अशी येथे व्यवस्था असेल, अशी माहिती आमदार रईस शेख यांनी दिली.