मध्यवर्ती रुग्णालयात रुग्णांना मिळते वॉर्डच्या गेटवर जेवण
उल्हासनगर : रुग्णांना रुग्णालयाकडून जेवण देण्यात येते. ते जेवण रुग्णांना बेडजवळ नेवुन देणे बंधनकारक असताना उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात मात्र जेवण देण्याचा प्रकार वेगळा असल्याचे प्रकर्षाने निदर्शनास आले. जेवण वाटप करणाऱ्या महिला कर्मचारी रुग्णांना वार्डातील गेटवर आवाज देवुन एखाद्या कैद्याप्रमाणे त्यांची थाळी वाटी घेवून बोलावून जेवण देतात. मग तो रुग्ण फॅक्चर झालेला असो, किंवा त्याला युरिन पाईप लावलेला असो. त्या रुग्णाला कसे तरी चालत जावून स्वतःच जेवण घ्यावे लागते. असा जेवण वाटपाचा प्रकार रुग्णालयात रोज होत असून रुग्णालयात जेवण पुरवण्याऱ्या ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याची मागणी ‘आरपीआय'चे (आठवले गट) शहर जिल्हा कार्याध्यक्ष तथा माजी नगरसेवक शांताराम निकम यांनी केली आाहे. यासंदर्भात ते लवकरच उपसंचालक यांची भेट घेवून निवेदन देणार आहेत.
उल्हासनगर येथे मध्यवर्ती रुग्णालयात गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येतात. ज्या रुग्णांना घरचे जेवण येत नाही, त्या रुग्णांना रुग्णालयामार्फत जेवण देण्यात येते. मात्र, रुग्णालयातील किचनचा ठेका ठाणे येथील चांदणे नावाच्या इसमाला दिला आहे. त्याने त्याचे कर्मचारी जेवण तयार करण्यापासून ते रुग्णालयातील प्रत्येक वार्डात जेवण वाटप करण्यापर्यंतचे काम चांदणेचे कर्मचारी करतात.
रुग्णालयात जो रुग्ण बेडवर आहे, तो चालू शकत नाही. एखाद्या रुग्णाला युरिन पाईप लावलेला आहे, तो जेवण घेण्यासाठी जावू शकत नाही. मात्र, जेवण वाटप करणाऱ्या महिला कर्मचारी जेवणाची ट्रॉली वार्डात न नेता वार्डाच्या गेटवर उभे करुन रुग्णांना जेवण घेण्यासाठी थाळी आणि वाटी घेवून बोलावतात. तर ते रुग्ण रांगेत उभे राहून मजबुरीने जेवण घेतात. एक रुग्ण तर हातात युरिन बॅग घेवून जेवण घ्यायला रांगेत उभा असून दुसरा रुग्ण त्याच्या दोन्ही पायाला प्लास्टर असताना सुध्दा तो जेवण घ्यायला वार्डाच्या गेटवर येतो. त्यामुळे सदरचा संतापजनक प्रकार असून जेवण वाटपाचा ठेका रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी रद्द करुन जेवण देणाऱ्या माहिला कर्मचारी यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी शांताराम निकम यांनी केली आहे.
दरम्यान, रुग्णांना वार्डाच्या गेटवर बोलवून जेवण देण्याचा प्रकार संतापजनक आहे. जेवण रुग्णांना बेडवर पोहोचले पाहिजे. मात्र, मध्यवर्ती रुग्णालयात तसे होत नाही. म्हणून ठेकेदाराचा ठेकाच रद्द करावा, अशी मागणी माजी नगरसेवक शांताराम निकम यांनी केली असून ते लवकरच उपसंचालक डॉ. अशोक नांदापूरकर यांची भेट घेऊन सदर सर्व प्रकार निवेदनामार्फत त्यांच्याकडे सादर करणार आहेत.