अनधिकृत इमारत जमीनदोस्त; सिडको तर्फे ५ आदिवासींच्या घराचे नुकसान
खारघर : सिडको तर्फे खारघर मध्ये अनधिकृत इमारत जमीनदोस्त करताना ५ आदिवासी कुटुंबांच्या घरांचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्यामुळे ग्रामस्थांनी आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेवून त्यांच्याकडे न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.
खारघर सेक्टर-५ मधील मित्र हॉस्पिटल शेजारी असलेल्या हेदोरावाडी आदिवासी पाड्यालगत एका बांधकाम व्यावसायिकाने एका आदिवासी व्यक्तीच्या मदतीने ५ मजली बेकायदा इमारत उभारुन या इमारतीत जवळपास शंभर घरे बांधली होती. दरम्यान, ‘सिडको'च्या अनधिकृत बांधकाम नियंत्रक विभाग तर्फे २ एप्रिल रोजी सदर अनधिकृत इमारत जमीनदोस्त करण्यात आली. मात्र, या कारवाईत सदर बेकायदा इमारती लगत असलेल्या हेदोरावाडी आदिवासी पाड्यातील बबन नाग्या पारधी, बाबू पदू गिरा,अंबो हिरा दोरे, यशवंत गणपत पारधी आणि राजू अंबो दोरे आदी कुटुंबियांच्या घरांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.
मोलमजुरी करुन आम्ही कुटुंबियांचा उदरनिर्वाह करीत आहे. ‘सिडको'ने बेकायदा इमारतीवर तोडक कारवाई करताना आम्हा गरिबांच्या घरांचे नुकसान केले आहे. ‘सिडको'ने नुकसान झालेल्या घरांची दुरुस्ती करुन द्यावी, अशी हैदोरावाडी आदिवासी पाड्यातील ग्रामस्थांची मागणी आहे, असे हैदोरावाडी ग्रामस्थांनी सांगितले.
दरम्यान, ‘सिडको'ने बेकायदा इमारतीवर तोडक कारवाई करताना पनवेल महापालिका द्वारे हेदोरावाडी आदिवासी पाड्यातील ग्रामस्थांसाठी बांधण्यात आलेल्या दोन सार्वजनिक स्वच्छतागृहाचे नुकसान केल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
सिडको तर्फे बेकायदा इमारतीवरील तोडक कारवाईच्या वेळी हेदोरावाडी आदिवासी पाड्यातील ग्रामस्थांच्या घरांचे नुकसान झाल्यामुळे सदर ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील यांच्या मदतीने १० एप्रिल रोजी सकाळी आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेवून परिस्थिती सांगितली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी, तोडक कारवाई करण्यात आलेल्या बेकायदा इमारत शेजारील कुटुंबियांना योग्य ती जागा मिळण्यासाठी तसेच नुकसान झालेल्या घरांची नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सहकार्य केले जाईल, असे ठोस आश्वासन हेदोरावाडी ग्रामस्थांना दिले. यावेळी हेदोरावाडी आदिवासी पाड्यातील ग्रामस्थ उपस्थित होते. याविषयी ‘सिडको'च्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होवू शकला नाही.
सिडको द्वारे अनधिकृत इमारतीवर तोडक कारवाई करण्यासाठी जेसीबी आणि पोकलन आणण्यात आले होते. पोकलन आणि जेसीबी यांच्यामुळे खारघर सेक्टर- ५ मधील हैदोरावाडी आदिवासी पाड्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे तसेच पथ दिव्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ‘सिडको'ने खराब झालेला रस्ता दुरुस्त करुन द्यावा, अशी मागणी केली आहे, असे हैदोरावाडी ग्रामस्थानी सांगितले.
हेदोरावाडी आदिवासी पाड्यातील ५ ग्रामस्थांच्या घरांचे झालेले नुकसान आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर यानी आदिवासी कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले आहे.- विजय पाटील, सामाजिक कार्यकर्ते, खारघर, पनवेल.