वातावरण बदलाने सर्दी, खोकला रुग्णात वाढ
वाशी : मागील काही दिवसांपासून सतत होणाऱ्या हवामानातील बदलामुळे नवी मुंबई शहरात ताप आणि सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढल्याचे चित्र दिसत आहे. दुपारी कडक ऊन तर रात्री हवेतील गारवा असे वातावरण अनेकांच्या प्रकृतीवर परिणामकारक ठरु लागले आहे. यामुळे खाजगी आणि नवी मुंबई महापालिका रुग्णालयात रुग्णांचा रांगा वाढल्या आहेत.यंदा फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळा सुरु झाल्याने वातावरण कमालीचे तापले आहे. दिवसा कडक उन्हाच्या झळा असल्याने दिवसा गरम तर पुन्हा रात्री गारवा यामुळे नवी मुंबई शहरात सतत बदलत्या हवामानामुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे.
सध्या नवी मुंबई शहरात हवा प्रदूषण देखील वाढले आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरात मध्यवर्ती असलेल्या वाशी येथील नवी मुंबई महापालिका रुग्णालयातही बाह्यरुग्ण सेवेत वाढ झाली आहे. याशिवाय खाजगी रुग्णालयात देखील रुग्णाच्या रांगा लागल्या आहेत. नवी मुंबई शहरात मागील काही दिवसात वातावरणात सातत्याने बदल होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे लहान मुले-मुली तसेच नागरीक यांच्या आजारी पडण्याच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्यात सर्दी, खोकला रुग्ण संख्या वाढू लागली आहे. सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची संख्याही नवी मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात असून, सातत्याने होणाऱ्या बदलामुळे डोकेदुखी, ताप, सर्दी तसेच खोकला वाढत आहे. सकाळी आणि सायंकाळी हवेत बदल होत असल्याने अचानक थंडीही जाणवत आहे. दिवसा पडणाऱ्या कडक उन्हामुळे कामानिमित्ताने घराबाहेर निघणाऱ्यांच्या अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. मात्र, रात्री हवेतील गारव्यामुळे बोचरी थंडी जाणवत असल्याने नागरिकांना एकाच दिवसामध्ये दोन ऋतू अनुभवायला मिळत आहेत. परंतु, त्याचा परिणाम प्रकृतीवर होत असल्यामुळे अनेक जण सर्दी, ताप आजाराने ग्रासले आहेत. त्यापैकी अनेकांना घशाचे देखील त्रास जाणवत आहेत. दुसरीकडे वातावरणातील हवा प्रदूषण आणि व्हायरल इन्फेक्शन यांसारख्या कारणांमुळेही सर्दी, खोकला आणि ताप रुगण वाढण्याची शक्यता आरोग्य क्षेत्रातील तज्ञांनी वर्तवली आहे.
सध्या वातावरण बदलाने नवी मुंबई शहरामध्ये सर्दी, खोकला आजाराचे रुग्ण वाढले आहेत. नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन नवी मुंबई महापालिका आरोग्य विभागाकडून सातत्याने केले जाते. उन्हात जाताना काळजी घेतल्यास, पाणी जास्त पिल्यास उष्माघात होणार नाही. सर्दी, खोकला किंवा ताप यांसारखी लक्षणे जाणवत असतील, तर नागरिकांनी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. - डॉ. राजेश म्हात्रे, वैद्यकीय अधीक्षक - नवी मुंबई महापालिका सार्वजनिक रुग्णालय, वाशी.