‘राडारोडा'च्या भरावाने झाडांची कत्तल?
वाशी : नवी मुंबई महापालिका बेलापूर विभाग अंतर्गत गणपतशेठ तांडेल मैदालगत मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकला जात आहे. मात्र, राडारोडा सरसकट झाडांच्या मुळांवर टाकला जात असल्याने येथील झाडे मृत होत चालली आहेत. परंतु, या साऱ्या प्रकाराकडे महापालिका परिमंडळ-१ आणि उद्यान विभाग अधिकारी यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याने झाडांचा नाहक बळी जात आहे.
नवी मुंबई शहरात आज मोठ्या प्रमाणात नवीन इमारती बांधण्याची तसेच पुनर्विकासाची कामे सुरु असल्याने ठिकठिकाणी खोदकामे सुरु आहेत. खोदकामातून निघणाऱ्या राडारोड्याची (डेब्रीज) रितसर विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे. मात्र, नियमांना तिलांजली देऊन राडारोडा वाहतुकदार नवी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने मनमानी पध्दतीने कुठेही राडारोडा खाली करत आहेत. त्यामुळे सध्या नवी मुंबई शहरातील कांदळवन, हिरवाई नष्ट होत चालली आहे. हिरवाई नष्ट करण्याचा उद्योग बेलापूर विभागात देखील सुरु आहे. बेलापूर विभागातील गणपतशेठ तांडेल मैदान लगत मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकला जात आहे. राडारोडा थेट येथील झाडांच्या मुळांवर टाकण्यात आला असून, या राडारोड्याखाली अनेक झाडे मृत पावली असून, उर्वरित झाडांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे राडारोड्याचा भराव टाकून झाडांची कत्तल करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी पर्यावरण प्रेमींकडून होत आहे. याबाबत नवी मुंबई महापालिका उपायुवत (परिमंडळ-१) सोमनाथ पोटरे आणि उपायुवत (उद्यान, (परिमंडळ-१) किसनराव पलांडे यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद लाभला नाही.
-----------------------------------
गणपतशेठ तांडेल मैदानात जर ‘डेब्रिज'चा भराव टाकून झाडांची कत्तल केली जात असेल तर त्याठिकाणी पाहणी करुन कार्यवाही करण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना देण्यात येतील. - सुनील कोठुले, सहाय्यक आयुक्त (परिमंडळ-१) - नवी मुंबई महापालिका.