‘केडीएमसी'तील ४९८ कर्मचारी कायम
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका अंतर्गत २७ गावातील ४९८ कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत कायम करण्याची कामगारांची गेल्या अनेक वर्षापासूनच प्रतिक्षा अखेर संपली आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सदर ४९८ कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत कायमस्वरुपी समाविष्ट करण्यात आले आहे. औपचारिकरित्या मजहापालिका आयुक्त अभिनव गोयल आणि आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते २५ कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
कल्याण-डोंबिवली महापालिका मध्ये २०१५ साली २७ गावे समाविष्ट झाली होती. या गावातील ग्रामपंचायतींमधील कर्मचारी महापालिका सेवेत वर्ग करण्यात आले. मात्र, गेल्या १० वर्षापासून महगापालिकेच्या सेवेत कार्यरत असलेल्या ४९८ कामगारांना सेवेत कायम करण्याबाबत प्रश्न अधांतरीत होता. महापालिका सेवेत असलेल्या २७ गावातील कामगारांनी कायमस्वरुपी सेवेत वर्ग करण्यासाठी शासनस्तरावर नगरविकास विभागाकडून मंजुरी मिळविण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकात शिंदे यांच्यासह ‘कल्याण ग्रामीण'चे आमदार राजेश मोरे आणि ‘२७ गाव संघर्ष समिती'कडे धाव घेतली होती. खा. डॉ. श्रीकात शिंदे यांनी शासनस्तरावर विशेष प्रयत्न केल्याने अखेरीस गेल्या १० वर्षापासून ४९८ कर्मचाऱ्यांना प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागून राज्य शासनाने ‘केडीएमसी'ला आदेशित केले होते.