‘कळंबोली जंक्शन'चे रुपडे पालटणार

अखेर वाहन चालकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका 

नवीन पनवेल : ‘महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळ'कडून कळंबोली जंक्शनची नव्याने सुधारणा करण्यात येत आहे. त्यासाठी कळंबोली सर्कल येथे नव्याने उड्डाणपुल आणि भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे कळंबोली सर्कल येथे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई वाहिनीवरील पनवेल एक्झिट ११ फेब्रुवारी २०२५ पासून ६ महिन्यांपासून बंद ठेवण्यात आला आहे. सध्या येथील काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच पनवेल एक्झिट वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

दुसरीकडे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील येत्या काळात सुरु होणार असून यापूर्वी विमानतळाला रस्ते जोडणीचे काम आता जलदगतीने सुरु झाले आहे. कळंबोली जंक्शनवर होत असलेल्या वाहतूक कोंडीमधून वाहन चालकांना दिलासा मिळणार आहे. सध्या सदरचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. खोदकाम करायला सुरवात केली असून सर्व यंत्रणा जलदगतीने कामाला लावली आहे. पुलाचे पायाभरणीचे काम सुरु असून जवळपास १०० फाईल फाऊंडेशन म्हणजेच स्तंभ तयार झाले आहेत.

दरम्यान, एनएचएआय आणि सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने, टीआयपीएल पनवेल यांच्या मार्फत सदर काम सुरू आहे.

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग...
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरुन पनवेल, गोवा, जेएनपीटीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना कोनफाटा (कि.मी. ९.६००) येथे डावीकडे वळण घेऊन एनएच-४८ मार्गावरून पळस्पे सर्कल येथून इच्छितस्थळी जाता येणार आहे. तसेच मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून (पनेवल एविझट) येथून तळोजा, कल्याण-शिळफाट्याकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना सरळ पनवेल-शीव महामार्गावरुन पुरुषार्थ पेट्रोलपंप उड्डाणपुलाखालून उजवीकडे वळण घेऊन रोडपाली येथून एनएच-४८ महामार्गावरुन इच्छितस्थळी जाता येणार आहे.

जंक्शन अपग्रेडेशनचे फायदे...
कळंबोली जंक्शन अपग्रेड करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याकरिता रस्ते विकास महामंडळ नोडल एजन्सी असून केंद्रीय रस्ते विकास विभागाकडून ७७० कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे. यामुळे जंवशन वाहतूक सिग्नल आणि ट्रॅफिक फ्री होणार आहे. त्यामुळे तासन्‌तास वाहनांना अडकून पडावे लागणार नाही. क्रॉस कॉनपलेक्ट सुध्दा दूर होणार आहे.

परिणामी, वेळ आणि इंधन वाचणार आहे. तर माती परीक्षणाचे काम सुध्दा युध्द पातळीवर सुरू आहे. या व्यतिरिक्त कामामध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये यासाठी ६ महिन्यांसाठी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पनवेल एक्झिट बंद करण्यात आली आहे.

भूमीपुजनानंतर कामाला बराच उशीर झाला; पण अखेर कामाला सुरुवात झाली असून नवी मुंबईची स्वागतकमान असणाऱ्या या कळंबोली जंक्शनचे रुपडे पालटणार आहे. याची डिझाईन पाहता होणारी ट्रॅफिक समस्येचा तिढा सुटणार आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘कासार्डी नदी संवर्धन'साठी महापालिकेचा पुढाकार