नदीकाठच्या भागात पावसाचे पाणी
भिवंडी : २३ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात झालेल्या पावसाने कामवारी नदीची पातळी वाढली असून नदीलगत तर पुढे खाडीलगत क्षेत्रातील अनेक झोपडपट्टी परिसरात पाणी शिरल्याची घटना घडली आहे. शहरातील बाजारपेठ, मंडई, तीनबत्ती, भाजी मार्केट यासह तांडेल मोहल्ला या भागात तर शेलार नदीनाका या परिसरात त्यासोबत खोणी ग्रामपंचायत हद्दीत खाडीपार या भागात झोपडपट्टी मध्ये पाणी शिरले आहे.
दरम्यान, २४ जून रोजी सकाळपासून पावसाने उसंत घेतल्याने पाणी पातळी कमी झाल्याने उशिरा पाणी उसरण्यास सुरवात झाली. परंतु, तरी सुध्दा खबरदारी म्हणून नदी काठच्या लोकांना सावधगिरीचा इशारा आपत्कालीन यंत्रणेने दिला आहे. रात्री झालेल्या पावसामुळे नदीनाका नजिकच्या महापालिका हद्दीतील म्हाडा कॉलनी येथील काही घरांमध्ये पाणी शिरले. तर खोणी ग्रामपंचायत हद्दीतील खाडीपार रसुलबाद परिसरातील खाडीकिनारी असलेल्या झोपडपट्टीत पाणी शिरल्याने तेथे सुध्दा मोठे नुकसान झाले आहे. शहरातील बाजारपेठेत सुध्दा मोठे नुकसान झाले असून रात्री अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांचे नुकसान झाले आहे.
दरवर्षी पावसाळ्यात कामवारी नदी लगतच्या परिसरात पाणी तुंबण्याची घटना घडत असते. महापालिका प्रशासन नेहमी नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानंतर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत असते. मात्र, पावसाळ्याआधी कामवारी नदीतील गाळ काढणे अथवा नदीपात्र मोठे करण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असते. त्यामुळे येथील खाडीकिनारी राहणारे नागरिक आणि सखल भागातील राहणाऱ्या नागरिकांचे कुटुंब आपला जीव मुठीत धरुन वास्तव्य करीत असतात. विशेष म्हणजे ज्या ज्या वेळेस पावसाचे पाणी घरात शिरते, त्या त्या वेळेस येथील नागरिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत असते. मात्र, पूरग्रस्त आणि नुकसानग्रस्त नागरिकांना वेळीच तेथून सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी पालिकेचे तात्पुरते निवारा केंद्र नसल्याने अशाच परिस्थितीमध्ये नागरिकांना राहावे लागत आहे.