पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची बदली
भाईंदर : मराठी भाषिकांना महाराष्ट्रात राहूनही मिरा-भाईंदरमध्ये मोर्चासाठी संघर्ष करावा लावणाऱ्या मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची उचलबांगडी झाली असून त्यांच्या जागी निकेत कौशिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मिरा-भाईंदरमध्ये मराठी भाषिकांवर अन्याय करणाऱ्या पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांना सदर प्रकरण चांगलेच भोवले आहे. ८ जुलै रोजी मिरा रोडमध्ये मराठी एकीकरण समिती, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मोर्चार्'चे आयोजन केले होते. परंतु, सदर ‘मोर्चार्'ला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तसेच मोर्चा सुरु होण्यापूर्वीच पहाटेच अनेक नेते आणि पदाधिकारी यांना ताब्यात घेण्यात आले होते. अधिवेशन सुरु असल्यामुळे सदरचा प्रश्न विधानसभेत सुध्दा गाजला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी कोणीही मोर्चासाठी परवानगी मागितली, तर आमचे सरकार देत असते अशा प्रकारचे वक्तव्य केले. यानंतर ‘मोर्चार्'ला परवानगी मिळाली आणि नियोजित ठिकाणावरुन मराठी भाषिकांचा भव्य मोर्चा शांती पार्क ते मिरा रोड रेल्वे स्थानकापर्यंत नेण्यात आला होता. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी ९ जुलै रोजी पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची बदली करुन त्यांच्या जागी निकेत कौशिक यांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे पांडे यांना मराठी भाषिकांना मोर्चासाठी करावा लागलेला संघर्ष हेच कारण असल्याची चर्चा शहरात सुरु आहे.