‘नवी मुंबई मॅन्ग्रोव्ह पार्क योजना'ने स्वागत

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या मॅन्ग्रोव्ह पार्क योजनेचे पर्यावरणवाद्यांनी स्वागत केले आहे. तसेच गोराई-दहिसर पट्ट्यातील मॅन्ग्रोव्ह सेल प्रकल्पाच्या धर्तीवर सदर प्रकल्प लवकरच राबविला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या ‘मॅन्ग्रोव्ह संरक्षण-संवर्धन समिती'चे अध्यक्ष असलेले तत्कालीन कोकण विभागीय आयुक्त जगदीश पाटील यांनी लोकांना भरती-ओहोटीच्या वनस्पतींचे महत्त्व कळविण्यासाठी शहरात मॅन्ग्रोव्ह पार्क उभारण्यास यापूर्वी सहमती दर्शविली होती, असे ‘नॅटकनेक्ट फाऊंडेशन'चे संचालक बी. एन. कुमार यांनी सांगितले. जानेवारी २०१९ मध्ये उरण परिसरात एनएमएसईझेड आणि जेएनपीए अंतर्गत मॅन्ग्रोव्ह नष्ट होत असताना सदरची सूचना पुढे आली. ‘राज्य मॅन्ग्रोव्ह सेल'ने गोराई येथे मॅन्ग्रोव्ह पार्क प्रकल्प सुरु केला आणि तो मे पर्यंत तयार होण्याची अपेक्षा आहे. 

यासंदर्भात नवी मुंबई महापालिका शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी या बाबीला दुजोरा दिला आहे. महापालिका शहरात खारफुटी उद्यान उभारण्यासाठी राज्य वन विभागासोबत काम करणार आहे. खारफुटी उद्यान लोकांना शिकवण्यास मदत करेल की, समुद्रातील वनस्पती केवळ सामान्य दुर्गंधीयुक्त, दलदलीच्या, डासांनी भरलेल्या जागा नाहीत. ‘मॅन्ग्रोव्ह सेल'ने म्हटल्याप्रमाणे त्यांना निसर्गाचे सौंदर्य आणि भरती-ओहोटीच्या वनस्पतींचे खरे मुल्य समजेल. कांदळवनामुळे नागरिकांना त्सुनामी, भरती-ओहोटी, वादळ या काळात किनाऱ्यांचे रक्षण करणाऱ्या तसेच मासे आणि खेकड्यांसाठी प्रजनन स्थळ म्हणून काम करणाऱ्या समुद्री वनस्पतींचे महत्त्व पटवून देण्यास मदत होईल.

खारफुटी स्वस्त पर्जन्यवने देखील आहेत. ती स्वतःहून वाढतात, ज्यावर सरकार कोट्यवधी रुपये खर्च करते. दरम्यान, पर्यावरणवाद्यांनी विविध नागरी कार्यालयांच्या इमारतींमध्ये पावसाचे पाणी साठवणे आणि सौरऊर्जेचा वापर करणे यासारख्या सर्वसमावेशक पर्यावरण धोरणाची मागणी केली आहे. पण, पावसाचे पाणी साठवण्याचे कोणतेही धोरण नसल्यामुळे शहरातील पावसाचे सर्व पाणी थेट समुद्रात वाया जाते. म्हणूनच महापालिकेचे स्वतःचे धरण असूनही लोकांना पाणीकपातीचा सामना करावा लागतो, अशी खंत बी. एन. कुमार यांनी व्यवत केली. वास्तविक पाहता ‘नॅटकनेवट'ने मसुदा विकास आराखड्याच्या सूचनांमध्ये असे सुचवले होते की, सर्व नवीन इमारतींमध्ये सौरऊर्जा, पावसाचे पाणी साठवणे, सांडपाणी आणि कचऱ्याचे पुनर्वापर करणे यासारख्या गोष्टींची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी. शहरी कचरा व्यवस्थापन नवी मुंबई महापालिकेचा प्रकल्प राहू नये; तो घरगुती प्रकल्प असावा, असे पर्यावरण निरीक्षकांनी विकास आराखडावरील सुनावणीवेळी अधिकाऱ्यांना सांगितले.

नवी मुंबई महापालिका ग्रीन झोन ४० हेक्टरने वाढवण्याच्या उद्दिष्टासह ४५,००० रोपे लावणार आहे. शहरातील ८ ठिकाणी स्टॅटिक फॉग कॅनन मशीन बसवण्याची आणि धूळ दाबणारी वाहने तैनात करण्याचीही योजना आखली आहे. पामबीच मार्गावरील नेरुळ येथे मोठ्या प्रमाणात प्रजननासाठी मदत करणाऱ्या प्रजातींची रोपे लावून फुलपाखरु उद्यानाची योजना आखली आहे.
-शिरीष आरदवाड-शहर अभियंता, नवी मुंबई महापालिका.

‘नमुंमपा'ने सर्व मोकळ्या जागा आणि भूखंड ताब्यात घेण्यासाठी प्रभावी पावले उचलली पाहिजेत. आकार काहीही असोत आणि ‘सिडको'ला नमुंमपा क्षेत्रात कोणताही नवीन विकास करण्याची परवानगी देऊ नये.
-बी. एन. कुमार, संचालक-नॅटकनेक्ट फाऊंडेशन.

पुनर्विकास प्रकल्पांच्या नावाखाली अधिक काँक्रीटची जंगले निर्माण करण्याऐवजी, आपल्याला शहरी जंगले निर्माण करण्याची आवश्यकता आहे. कोपरखैरणे आणि नेरुळ येथे निर्माण केलेली मियावाकी जंगले चांगले उदाहरण आहे. पारसिक हिल्स आणि वाशी, नेरुळ, सानपाडा, ऐरोली आणि एमआयडीसी औद्योगिक पट्ट्यासारख्या इतर भागात आपल्याला असे अधिक प्रकल्प हवेत.
-मधु शंकर, पर्यावरण कार्यकर्त्या. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

भाजपा तर्फे पनवेल मध्ये मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा