दुर्गाडी किल्ला प्रकरण
कल्याण : कल्याण मधील इतिहास कालीन दुर्गाडी किल्याची संरक्षक भिंत ४ जून रोजी पहाटे झालेल्या पावसात कोसळल्याची घटना घडली. या पुरातन ऐतिहासिक ठेव्याची जबाबदारी आपल्या अंगावरुन झटकण्यात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पुरातत्व विभाग यांची जुपंली असल्याचे यानिमित्ताने समोर आले असून शासन अंग असलेल्या दोन्ही विभागाची टोलावा टोली पाहता, जबाबदार कोण? असा सवाल यानिमित्ताने उभा ठाकला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या आरमारांची मुहूर्तमेढ कल्याण मधील दुर्गाडी किल्ला येथे रोवली. त्यामुळे ऐतिहासिक महत्त्व असलेले किल्ले दुर्गाडी लाखो शिवभक्तांचे श्रध्दा स्थान असून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करोडो रुपये खर्च करुन किल्याची डागडुजी तसेच बुरूजाचे काम, कमानीचे काम सुरू आहे. अशातच किल्ल्याच्या समोरील बाजुस असलेली संरक्षक भिंत अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसात ४ जून रोजी पहाटे कोसळली. कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी अधिकाऱ्यांना ठेकेदाराच्या हलगर्जीपणाबाबत खडे बोल सुनावित धारेवर धरले.
तर ५ जून रोजी खासदार सुरेश म्हात्रे यांनी दुर्गाडी किल्याच्या भिंतच्या ढासळलेल्या भागाची पाहणी करीत ठेकेदारावर कारवाईची मागणी करीत त्याला काळ्या यादीत टाकावे, असे सांगितले. या घटनेत पुरातन ऐतिहासिक ठेव्याच्या जबाबदारी आपल्या अंगावरुन झटकण्यात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पुरातत्व विभाग यांची जुपंली असल्याचे दिसून आले असतानाच, सार्वजनिक बांधकाम विभागाने उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी उपविभाग कल्याण यांना पत्र दिले आहे.
या पत्रात कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्याच्या भोवती बांधण्यात आलेली संरक्षण भिंत कोसळल्याबाबत संरक्षण भिंतीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आलेले नाही. सदरचे काम पुरातत्व विभागाकडून करण्यात आलेलं आहे. त्यामुळे या कोसळलेल्या संरक्षण भितीबाबत या विभागाकडुन कोणतीही कार्यवाही होणे क्रमप्राप्त होत नाही. सदर आपल्या माहितीसाठी आणि पुढील उचित कार्यवाहीस्तव सविनय सादर, अशा आशायाचे पत्र उपविभागीय अधिकारी (सा.बां, उपविभाग क्रं.१) कल्याण यांनी दिले असल्याने पुरातत्व विभागाकडे किल्ले दुर्गाडी भिंत कोसळल्याचे घटना प्रकरण वळले असल्याचे दिसून येत आहे.