मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पोलीस महानिरीक्षक दराडे यांचा सन्मान

नवी मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘कोकण परिक्षेत्र'चे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांचा १५० दिवसांच्या प्रशासकीय सुधारणांच्या मोहिमेअंतर्गत प्रथम क्रमांक आल्याबद्दल प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.

१५० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे भारतीय गुणवत्ता परिषदेतर्फे करण्यात आलेल्या अंतिम मुल्यमापनात विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र राज्यात सर्वोत्तम परिक्षेत्र ठरले आहे. वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तत्रज्ञानाचा वापर, आदि १० मुद्द्यांवर उत्कृष्ठ कार्य करणारे कार्यालय म्हणून ‘कोकण परिक्षेत्र'ची निवड करण्यात आली आहे.

या सुधारणा अभियान काळात विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र कार्यालयाकडून www.konkanrange.mahapolice.gov.in असे सुलभरित्या वापरता येणारे संकेतस्थळ तयार करण्यात आले. संकेतस्थळावर परिक्षेत्रातील अद्यावत माहितीसह, सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांचे संपर्क क्रमांक, माहिती अधिकार अन्वयेची माहिती, महत्वाच्या शासकीय विभागांची लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत सुकर जीवनमान मध्ये कार्यालयात नागरिकांकडून प्रापत होणाऱ्या तक्रार अर्जाचे योग्य नियोजन करण्याकामी संगणकीय अर्ज सनियंत्रण प्रणाली तयार करण्यात आली आहे. सीइआयआर पोर्टल अंतर्गत परिक्षेत्रातुन हरविलेल्या एकूण ६४४८ मोबाईलपैकी ३३०८ मोबाईलचा शोध लावून त्यापैकी १०३८ मोबाईल प्रत्यक्षात हस्तगत करण्यात ‘कोकण परिक्षेत्र'ने यश मिळवले. पोलिसांनी नागरिकांसोबत सौजन्यपूर्ण वागावे यासाठी पोलीसांना सॉपट स्किल ट्रेनिंग देवून पोलिसांची नागरिकांमधील प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे ‘कोकण परिक्षेत्र'चे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी सांगितले.  

सदर मोहिमेअंतर्गत संकेतस्थळ, डॅशबोर्ड, आपले सरकार पोर्टल, ई- ऑफिस प्रणाली,whatsapp channel, AI/Block chain आणि जीआयएसचा वापर या निकषांवर मूल्यमापन करण्यात आले. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

जन सुरक्षा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी शिवसेना तर्फे आंदोलन