बाप्पांचे आगमन खड्ड्यातून; निषेधार्थ आंदोलन
भाईंदरः मिरा-भाईंदर शहरातील सर्वच रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे भाविकांना गणपती बाप्पांच्या आगमनाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. त्यामुळे आता निदान गणेश विसर्जनापूर्वी तरी रस्ते दुरुस्त करावेत, या मागणीसाठी सामाजिक संस्थेने आंदोलन करुन निषेध नोंदवला आहे.
२७ ऑगस्ट पासून गणेशोत्सव सुरू झाला आहे. त्यापूर्वी दोन दिवस अगोदरपासून भाविकांनी सार्वजनिक गणपती मंडपात आणले होते. तर अनेक भाविकांनी २६ ऑगस्ट रोजी संध्याकाळी तर इतरांनी २७ स्ग्सट रोजी सकाळी घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना केली. ठिकठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्यामुळे गणेशमूर्ती आणताना भक्तांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागून तारेवरची कसरत करावी लागली. रस्त्यावरील खड्डे विसर्जनापूर्वी तरी बुजवून महापालिकेने भाविकांची गैरसोय दूर करावी यासाठी ‘संग्राम सामाजिक संस्था'चे अध्यक्ष श्रीनिवास निकम यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह दहिसर चेक नाका येथील वाहतूक पोलीस चौकीजवळ असलेल्या खड्ड्यात बसून आंदोलन केले.
जर महापालिकेकडे निधीची कमतरता असेल तर संस्था वर्गणी मागून निधी गोळा करेल. जमा झालेल्या पैशातून खड्डे बुजवावेत, अशी मागणी श्रीनिवास निकम यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.