‘ठामपा वर्षा मॅरेथॉन'मध्ये धर्मेंद्र, रविना गायकवाड विजेते
ठाणे : ‘मॅरेथॉन ठाणेची... ऊर्जा तरुणाईची' या घोषवाक्यासह आयोजित करण्यात आलेल्या ३१ व्या ठाणे महापालिका वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष गटात पुणे येथील ‘एएसआय'च्या धर्मेंद्र याने अव्वल स्थान पटकावले. त्याने ०१ तास ०७ मिनिटे आणि ४१ सेकंद वेळेसह २१ कि.मी.चे अंतर पार केले. तर महिला गटात नाशिकच्या रविना गायकवाड यांनी ०१ तास २५ मिनिटे आणि ४६ सेकंद वेळ घेत शर्यत पूर्ण केली. मॅरेथॉन स्पर्धेत सुमारे २५ हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी ‘मॅरेथॉन'ला झेंडा दाखवला. तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते विजेत्या धावपटुंना गौरविण्यात आले.
कोरोनापासून गेली ५ वर्षे खंडित झालेली ठाणे मॅरेथॉन स्पर्धा यंदा आबालवृध्दांच्या सहभागाने अत्यंत उत्साहात झाली. यावेळी सहभागी धावपटुंचा उत्साह पाहून ‘मॅरेथॉन'ला झेंडा दाखवल्यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ‘मॅरेथॉन'मध्ये धावण्याचा आनंद घेतला. त्यांनी धावपटुंसमवेत काही अंतर धावून त्यांचा उत्साह वाढवला.
ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या ‘३१व्या वर्षा मॅरेथॉन'चे १० ऑगस्ट रोजी सकाळी आयोजन करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरुष गटाच्या तर लता शिंदे यांनी महिला गटाच्या स्पर्धेला झेंडा दाखवला. त्यानंतर टप्प्याटप्याने एकूण १२ गटातील स्पर्धांचा शुभारंभ महापालिका मुख्यालयासमोरील चौकातून करण्यात आला. याप्रसंगी खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी उपमहापौर पल्लवी कदम, महापालिका आयुक्त सौरभ राव, माजी ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, एकनाथ भोईर, परिवहन सेवेचे माजी सभापती विलास जोशी, माजी नगरसेवक पवन कदम, विकास रेपाळे, नम्रता भोसले, राजेश मोरे, सिध्दार्थ ओवळेकर, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, परिवहन व्यवस्थापन भालचंद्र बेहरे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, सचिन सांगळे, दिनेश तायडे, शंकर पाटोळे, मिताली संचेती, क्रीडा उपायुक्त मीनल पालांडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील, आदि उपस्थित होते.
ठाणे वर्षा मॅरेथॉन थोड्या खंडानंतर आता पुन्हा होत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. या क्षणी या ‘मॅरेथॉन'साठी पहिल्यापासून पुढाकार घेणारे माजी खासदार सतीश प्रधान यांनी प्रकर्षाने आठवण होत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मॅरेथॉन'ला प्रारंभ करून देताना सांगितले. ठाणे बदलतंय आणि त्या बदलत्या ठाणेबरोबर येथील तरुणाईलाही ऊर्जा देण्याचे काम मॅरेथॉन करीत आहे. म्हणूनच 'मॅरेथॉन ठाणेची...ऊर्जा तरुणाईची' असे घोषवाक्य घेतले आहे. तू धाव, तू धाव...घे क्षितिजाचा ठाव असे गाणेही अत्यंत प्रेरणादायी असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
ठाणे मध्ये सप्टेंबर महिन्यात ‘मेट्रो'ची ट्रायल रन होणार आहे. अंतर्गत ‘मेट्रो'चे कामही सुरु होत होत आहे. त्यामुळे ठाणेचे रुप आणखी बदलेल. आपले ठाणे हरित होत आहे. यंदा २ लाख झाडे लावण्याचा महापालिकेचा निश्चय केला असल्याचेही ना. शिंदे यांनी सांगितले.
याप्रसंगी इंग्लड ते फ्रान्स असे सागरी अंतर पोहून जाणाऱ्या भारतीय संघातील जलतरणपटू आयुषी कैलास आखाडे, आयुष प्रवीण तावडे, मानव राजेश मोरे या जलतरणपटुंचा त्याचप्रमाणे, आतंरराष्ट्रीय ॲथलिट शौर्या अविनाश अंबुरे आणि फुल्ल आर्यनमॅन स्पर्धा पूर्ण करणाऱ्या स्मिता जावळे यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कॉर्पोरेट रन...
महापालिका अधिकारी-कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी, पत्रकार यांच्यासाठी १ कि.मी.ची ‘कॉर्पोरेट रन' ठेवण्यात आली होती. त्याचप्रमाणे ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्या स्पर्धेत महिला आणि पुरुष गटात ज्येष्ठ नागरिक उत्साहाने सहभागी झाले होते. त्याचबरोबर, दिव्यांगांच्या त्रिदल समुहानेही या ‘मॅरेथॉन'मध्ये विशेष सहभाग घेतला.
एकूण १० लाखांची बक्षिसे...
ठाणे वर्षा मॅरेथॉन स्पर्धा विविध १२ गटात संपन्न झाली. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण १० लाख ३८ हजार ९०० रुपयांची रोख पारितोषिके देण्यात आली. मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना देण्यात येणाऱ्या पारितोषिकांमध्ये वाढ करण्यात आली. २१ कि.मी. स्पर्धेतील विजेत्यास १ लाखाचे रोख पारितोषिक, सन्माचिन्ह, मेडल आणि प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.