‘मुक्त विद्यापीठ'साठी राखीव भूखंडाचा गैरवापर
ठाणेः ‘यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ'साठी ठाणे महापालिकेच्या आरक्षित भूखंडाचा गैरवापर होत असल्याचा आरोप करीत ‘मनसे'च्या वतीने आरक्षित भूखंडाजवळ १२ मार्च रोजी ठिय्या आंदोलन करुन महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला. सदर भूखंड त्वरित अतिक्रमण मुक्त करण्यात यावा. तसे न केल्यास सदर विषयासंदर्भात शिक्षण मंत्र्यांकडे दाद मागण्यात येईल, असा इशारा ‘मनसे'च्या वतीने महापालिका प्रशासनास दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
आरक्षित भूखंडाचा शिक्षणाच्या उद्देशाने वापरण्याऐवजी अन्य व्यावसायिक उपक्रमांसाठी वापरला जात असल्याची गंभीर बाब ‘मनसे'च स्वप्नील महिंद्रकर यांनी उघड केली होती. सदर भूखंडावर कपडे आणि घरगुती वस्तू विक्री प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याने सदरचा प्रकार थेट भूखंडाच्या उद्देशाविरुध्दचा गैरवापर असल्याचे दिसून येत असतानाही ठाणे महापालिकाकडून दुर्लक्ष झाले, असे ‘मनसे'तर्फे सांगण्यात आले.
ठाणे महापालिका प्रशासनाने पोखरण क्रमांक-२, हिरानंदानी जवळील निहारिका संकुलाजवळ असलेला सदर भूखंड ‘यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ'ला कवडीमोल भावात भाडेतत्त्वावर दिला होता. ठाणे शहरात विद्यापीठाचे केंद्र नसल्याने, स्थानिक विद्यार्थ्यांना मुंबई किंवा अन्य ठिकाणी जाण्याची गरज भासू नये, असा मुख्य उद्देश होता. या भूखंडावर ‘विद्यापीठ'ची स्थापना करुन ठाणेतील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देण्याचा महापालिकेचा हेतू होता. गेल्या १० वर्षांपासून सदरचा भूखंड रिकामा होता. मात्र, आता विद्यापीठ स्थापनेसाठी देण्यात आलेल्या जागेचा वापर व्यावसायिक कारणांसाठी केला जात आहे. या भूखंडावर ‘विद्याापीठ'ऐवजी कपडे आणि घरगुती वस्तुंचे प्रदर्शन भरवण्यात आल्याने ‘मनसे'च्या वतीने सदर भूखंड खाली करण्यासाठी तसेच भूखंड धारकाला भूखंडाचा व्यावसायिक वापर केल्याच्या अनुषंगाने त्याच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी महापालिका आयुक्त राव यांना निवेदन देखील देण्यात आले होते.
पण, सदर निवेदनाची दखल न घेतल्याने ‘मनसे'चे ठाणे उपशहर अध्यक्ष पुष्कर विचारे यांच्या वतीने ‘यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ'साठी आरक्षित सदर भूखंडाजवळ ठिय्या आंदोलन करुन प्रशासनाचा निषेध करण्यात आला. सदर आंदोलनात किरण पाटील, निलेश चौधरी, महेश चव्हाण, रवींद्र महाले, सागर भोसले, योगेश मोहिते तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.