विमान प्रवासात फोर्टीस हॉस्पिटलच्या ३ महिला तज्ञांनी वाचविले प्रवाशाचे प्राण
नवी मुंबई : फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटल, वाशी येथील वैद्यकीय तज्ञांच्या टीममधील वरिष्ठ मोहिनी चंद्रशेखर (प्रमुख नर्सिंग अधिकारी), डॉ. प्रियांका काळे (समन्वयक-वैद्यकीय सेवा) आणि पुनम कनस्कर (प्रमुख-क्वॉलिटी) ८ मार्च रोजी फोर्टिसच्या मेडिकल स्ट्रॅटेजी अँड ऑपरेशन्स ग्रुप (एमएसओजी) कार्यशाळेत सहभागी झाल्यानंतर इंडिगोच्या विमानाने दिल्लीहून मुंबईला परतत होत्या. उड्डाणानंतर जवळपास १५ ते २० मिनिटांनी केबिन क्रुने वैद्यकीय आणीबाणीमुळे उपलब्ध असलेल्या कोणत्याही डॉक्टर किंवा नर्सकडून त्वरित मदत मागितली. यावेळी कोणताही संकोच न करता डॉ. प्रियांका काळे, मोहिनी चंद्रशेखर आणि पुनम कनस्कर यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुढाकार घेतला.
पलाईटमधून प्रवास करणारा मध्यमवयीन पुरुष प्रवासी अचानक बेशुध्द झाला होता. तो जवळपास प्रतिसाद देत नव्हता, त्याला खूप घाम येत होता आणि त्याची नाडी खूप कमकुवत होती. त्याला गंभीर हायपोग्लायसेमिक शॉक आल्याचे दिसून आले, ज्यामुळे नाडीचा दर धोकादायकपणे कमी झाला होता. रुग्णाशी संवाद साधल्यानंतर (तो जेमतेम प्रतिक्रिया देऊ शकला) त्याला मधुमेह असल्याचे कळले. तात्काळ धोका लक्षात येताच फोर्टीसच्या टीमने त्वरित उपचार सुरू केले. त्यांनी त्याच्या तोंडात एका सॅशे साखर ओतली आणि ती विरघळेपर्यंत निरीक्षण केले. पुढील ५ ते ६ मिनिटांत त्यांनी सदर प्रक्रिया पुन्हा केली, १ ते २ मिनिटांच्या अंतराने अधिक साखर दिली.
चौथ्या सॅशेनंतर प्रवासी हळूहळू शुध्दीवर अला आणि तो टीमला प्रतिसाद देऊ लागला. त्याची प्रकृती स्थिर झाली आणि तो संवाद साधू शकला. आभार मानत तो म्हणाला की, सकाळपासून काहीही न खाल्ल्यामुळे मला चक्कर आली असावी. वैद्यकीय टीमच्या सल्ल्यानुसार केबिन क्रुने त्याला नाश्ता आणि ज्यूस दिला. यानंतर त्ययाची प्रकृती अधिक स्थिर झाली. उर्वरित प्रवास कोणत्याही अडचणीशिवाय सुरु राहिला आणि रुग्ण इतर प्रवाशांसह मुंबईत सुरक्षितपणे उतरला.
सदर तज्ञ वैद्यकीय टीमच्या जलद आणि निर्णायक कृती प्रवाशाचे प्राण वाचवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले. त्यांनी तातडीने हस्तक्षेप केला नसता, तर प्रवाशाच्या गंभीर हायपोग्लाइसेमियामुळे घातक परिणाम झाले असते. विमानात ३०,००० फुट उंचीवर असताना देखील टीमने वेळेवर दिलेल्या प्रतिसादामधून गंभीर परिस्थितीत वैद्यकीय तज्ञांचे महत्त्व दिसून येते.