भात पिकावर कडप्पा रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल
उरण : उरण तालुक्यात खरीप हंगामात प्रामुख्याने भाताची शेती केली जाते. भाताच्या शेतीसाठी भरपूर पाणी आवश्यक असते. मात्र, गेले काही दिवस पावसाचा लपंडाव सुरु असल्याने भाताची शेती धोक्यात आली आहे. त्यात भाताच्या पिकावर मोठ्या प्रमाणात बगळा रोगाचा तसेच करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच तालुका कृषी अधिकारी गोरगरीब शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी दुर्लक्ष करीत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
भातशेतीचे कोठार समजल्या जाणाऱ्या उरण तालुक्यात औद्योगिकरण वाढत आहे. बहुतांश शेतकरी जमिनीवर भाताची शेती करीत आहेत. सध्या भाताचे पीक अंतिम टप्प्यात असून कणसे तयार झाली असून भाताचे पूर्ण पीक तयार होण्यासाठी आणखी काही दिवस पावसाच्या पाण्याची आवश्यकता आहे. पावसाच्या पाण्याचा तुटवडा उरण तालुक्यातील काही भागात शेतीसाठी दिसून येत आहे. भातशेतीसाठी सर्वाधिक पाणी लागत असते.
यावर्षी पाऊस सर्वात जास्त पडला खरा; मात्र भाताच्या शेतामध्ये पाणीच उरले नसल्याने माळरानावर असलेली भाताची खाचरे पाण्याच्या अभावी सुकलेली आहेत. शेतात पडलेली रोगराई देखील मोठी समस्या बनली आहे. भातशेतीमध्ये बहुसंख्य ठिकाणी बगळा रोगाने शिरकाव केला आहे. तर काही ठिकाणी करपा रोग देखील भाताच्या शेतात आढळून येत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
शेतकरी मोठ्या प्रमाणात भातशेती करीत आहेत. परंतु, गोर-गरीब शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ कृषी विभागाकडून मिळत नाही. त्यात सध्या भात पिकावर कडप्पा सारख्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने हाता तोंडाशी आलेले भात पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे तालुका कृषी अधिकाऱ्यांनी संकटग्रस्त शेतकऱ्यांना सहकार्य करावे, अशी आम्हा शेतकऱ्यांची मागणी आहे.
-चावजी भोईर, शेतकरी.