महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिवपदी श्रुती म्हात्रे यांची निवड
नवीन पनवेल : काँग्रेस पक्षाचे नेते दिवंगत शाम म्हात्रे यांची कन्या श्रुती शाम म्हात्रे यांनी आजपर्यंतच्या केलेल्या कामाची दखल घेत तसेच पक्षासाठी दिलेले महत्वाचे योगदान लक्षात घेता त्यांची निवड महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी करण्यात आली आहे.
काँग्रेस पक्षासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घालणाऱ्या व समाजहित, पक्षहित डोळ्यांसमोर ठेऊन नेहमी कार्यरत असणाऱ्या व काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक संप आंदोलन, मोर्चा बैठकांमध्ये सहभागी होणाऱ्या व अन्यायाविरोधात आवाज उठविणाऱ्या, गोरगरीबांना न्याय मिळवून देणाऱ्या श्रुती म्हात्रे यांची निवड काँग्रेस पक्षाच्या सचिवपदी झाल्याने काँग्रेस पक्षात आनंदाचे वातावरण असून पक्षाच्या सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे वाटून आनंद व्यक्त केला आहे. श्रुती म्हात्रे यांचे सर्वच पक्षाचे नेते, पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी चांगले संबंध असल्याने सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी, पदाधिकारी कार्यकत्यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे समन्वयक गणेश पाटील यांची नवनिर्वाचित कार्यकारी समिती सदस्य तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आर सी घरत यांच्यामवेत श्रुती शाम म्हात्रे यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट घेतली. म्हात्रे यांची निवड केल्याबद्दल राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, सह प्रभारी बी. एम. संदीप, व्यंकटेशजी, म.प्र.काँ. क. ओबीसी अध्यक्ष भानुदास माळी आणि इतर वरिष्ठ नेत्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांना भेटून श्रुती म्हात्रे यांनी आभार व्यक्त केले आहेत. पक्षाने ज्या पदाची जबाबदारी आज माझ्यावर सोपवली आहे ती जबाबदारी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे पार पाडण्याचा यथाशक्ती प्रयत्न करेन आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाचे विचार आणि काँग्रेस पक्षाने आजवर केलेले काम तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन. असे श्रुती म्हात्रे यांनी सांगितले.